युवराज संभाजीराजे छत्रपती आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची बंगळुरू मध्ये भेट : वळीवडे संग्रहालय प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा
भारत दौऱ्यावर असलेले पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क व युवराज संभाजीराजे छत्रपती यांची शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी बेंगळुरू येथे विशेष भेट होणार आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील मानवी इतिहासातील एका अत्यंत महत्त्वपूर्ण पर्वाची स्मृती जतन करण्यासाठी संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सन १९४२ ते १९४८ या सात वर्षांच्या कालावधीत कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने सुमारे ५,००० निर्वासित पोलिश नागरिकांना आश्रय दिला होता. त्यांच्यासाठी कोल्हापूरजवळील वळीवडे येथे विशेष छावणी उभारण्यात आली होती. या कालावधीत कोल्हापूरच्या जनतेने या पोलिश नागरिकांना निर्वासित म्हणून नव्हे, तर आपल्या पाहुण्यांप्रमाणे सन्मानाने आणि आत्मीयतेने सांभाळले. अशा कठीण काळात कोल्हापूरच्या जनतेने छत्रपती राजघराण्याच्या आश्रयाखाली पोलिश निर्वासितांचे मनःपूर्वक स्वागत केले. त्यांना या प्रदेशात सुरक्षितता आणि दुसरे घर मिळाले. यातून दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये ऋणानुबंधांचे संबंध निर्माण झाले व भारत – पोलंड द्विराष्ट्रीय मैत्रीचा पाया रचला गेला.
ही मैत्री व ऋणानुबंधांचे संबंध पुढे घेऊन जाण्यासाठी संभाजीराजे छत्रपती हे सातत्याने कार्यरत आहेत. संभाजीराजे यांच्या पुढाकारातून वळीवडे येथे निर्वासित छावण्यांची स्मृती जपण्यासाठी संग्रहालय साकारले जात आहे.
प्रस्तावित संग्रहालयात ऐतिहासिक दस्तऐवज, वैयक्तिक आठवणी, छायाचित्रे आणि ऐतिहासिक वस्तू यांच्या माध्यमातून हा वारसा जतन केला जाणार आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक देवाणघेवाण, शैक्षणिक उपक्रम आणि भारत-पोलंडमधील नागरिकांमधील परस्पर संवादासाठी एक कायमस्वरूपी व्यासपीठही निर्माण केले जाणार आहे.
सध्याच्या कार्यक्रमातील वेळापत्रक आणि तांत्रिक अडचणींमुळे पोलंडच्या पंतप्रधानांचा प्रस्तावित कोल्हापूर दौरा आयोजित करणे शक्य झाले नाही. तथापि, २०२७ च्या सुरुवातीला पोलंडचे एक मोठे शिष्टमंडळ कोल्हापूरला भेट देण्याची अपेक्षा आहे. त्यावेळी भारत आणि पोलंडच्या सहभागातून या संग्रहालयाचे भव्य उद्घाटन करण्याची संकल्पना आहे.
या पार्श्वभूमीवर संभाजीराजे व पंतप्रधान टस्क यांची बेंगळुरू येथे होणारी भेट विशेष महत्त्वपूर्ण आहे. या भेटीमुळे या उपक्रमाला नव्याने गती मिळेल आणि संग्रहालय प्रकल्प प्रत्यक्षात साकार करण्यासाठी दोन्ही देशांची सामायिक बांधिलकी अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा आहे.
या भेटीमुळे कोल्हापूर आणि पोलंड यांच्यातील ऐतिहासिक नातेसंबंध अधिक दृढ होणार असून सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक, तंत्रज्ञान आणि पर्यटन क्षेत्रात नव्या सहकार्याची दारे खुली झाली आहेत.
कोल्हापूरच्या जनतेसाठी ही भेट अत्यंत अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे. छत्रपती घराण्याची दूरदृष्टी, करुणा आणि कोल्हापूरच्या जनतेच्या मानवतावादी दृष्टिकोनातून निर्माण झालेला हा वारसा आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा गौरवला जात आहे.



