शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त
श्री महालक्ष्मी धर्मशाळा व श्री महालक्ष्मी अन्नछत्र यांचे उपक्रम भाविकांसाठी सुसज्ज
साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ असलेल्या कोल्हापूर तीर्थक्षेत्रात आई अंबाबाईचा नवरात्रोत्सव हा प्रमुख उत्सव आहे. या काळात देवीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक कोल्हापूर मध्ये येतात. या भाविकांच्या राहण्याची अल्पदरात व्यवस्था श्री महालक्ष्मी धर्मशाळेच्या माध्यमातून केली जाते. गेली ७३ वर्षे ही धर्मशाळा भाविकांच्या सेवेत आहे. यंदाच्या नवरात्रोत्सव देखील देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना राहण्यासाथी श्री महालक्ष्मी धर्मशाळा सुसज्ज करण्यात आली आहे. १२५ खोल्यांच्या माध्यमातून ८०० ते १००० भाविक येथे राहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. ही धर्मशाळा २४ तास खुली राहणार आहे. या धर्मशाळेत २४ तास गरम पाणी तसेच सी.सी.टी.व्ही, लिफ्ट व जनरेटर या सुविधा उपल्ब्ध आहेत. शिवाय केवळ दर्शन घेऊन परत जाणाऱ्या भक्तांसाठी अल्प दरात लॉकर सुविधा उपलब्ध लॉकर केली असुन यासाठी १०० लॉकर्स तयार ठेवले आहेत. भाविकांनी त्याचाही लाभ घ्यावा.
तसेच श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट तर्फे गेली १८ वर्षे श्री महालक्ष्मीच्या दर्शनास येणाऱ्या परगावच्या भाविकांना मोफत भोजनप्रसाद दिला जातो. नवरात्रोत्सवात हा आकडा १० ते १२ हजारांवर जातो. प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही सुरु होणाऱ्या नवरात्रासाठी कोल्हापूर मध्ये येणाऱ्या भाविकांना भोजनप्रसाद देण्यासाथी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सुसज्ज करण्यात आले आहे. अन्नछत्राची वेळ दोन तास वाढवून सकाळी ११ ते दुपारी ४ अशी करण्यात आले आहे. जास्तीत जास्त भाविक महाप्रसादाचा लाभ घेतील यासाठी बैठक व्यवस्था ही वाढविण्यात आली आहे. अन्नछत्र हॉलची स्वच्छता करण्यात आली असून कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. तरी सर्व भाविकांनी येथे भोजन प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी केले आहे.
याशिवाय श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट तर्फे प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही नवरात्रामध्ये ललिता पंचमीदिवशी असणाऱ्या त्र्यंबोली यात्रेनिमित्त त्र्यंबोली (टेंबलाई) देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत बससेवा देण्यात येणार आहे. तसेच नवरात्रोत्सव काळात ताराबाई रोड या ठिकाणी विद्युत रोषणाई व स्वागत कमान करणेत येणार आहे. तरी सर्व भक्तांनी विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील राजू मेवेकरी यांनी केले आहे.



