मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री मुश्रीफ यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
– आमदार शिवाजीराव पाटील
– मुश्रीफ यांच्याशी मतभेद संपले
– गोकुळमध्ये पॅनेल टू पॅनेल मतदान करणार
महागाव :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असेल. मंत्री हसन मुश्रीफ आणि माझ्यातील सर्व मतभेद संपले असून, महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या रक्तात गद्दारी नाही. एकदा शब्द दिला की त्यात बदल होत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पॅनेल टू पॅनेल मतदान करणार असल्याची ग्वाही आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिली.
महागाव ता . गडहिंग्लज येथे गोकुळच्या निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले, मुश्रीफ साहेब आणि माझ्यात कोणतेही वैयक्तिक मतभेद नाहीत. आमच्यातील मतभेद आता संपले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असेल. गोकुळमध्ये आम्हाला योग्य संधी मिळणार आहे; मात्र ती महायुतीचे सर्व पॅनेल विजयी झाल्यानंतरच मिळेल. आम्ही शपथ घेऊन सांगतो की, पॅनेल टू पॅनेल मतदान करणार आहोत. आमच्या रक्तात गद्दारी नाही. एकदा शब्द दिला की त्यात बदल होत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आमदार शिवाजीराव पाटील आणि आमच्यात काही मतभेद होते. तसेच शौमिका महाडिक यांनीही आपली बाजू मांडली होती. मात्र, आता आमच्यातील सर्व मतभेद गंगेला मिळाले आहेत. या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. गोकुळ हा ब्रँड एका दिवसात तयार झालेला नाही. त्यासाठी अनेक नेत्यांनी खस्ता खाल्ल्या आहेत. दूध उत्पादक, शेतकरी आणि कष्टकरी माता-भगिनींच्या योगदानातून गोकुळची ओळख निर्माण झाली आहे.
माजी सभापती भरमूअण्णा पाटील म्हणाले, गोकुळ दूध संघ राज्यातच नव्हे, तर देशात प्रथम क्रमांकावर यावा, अशी भूमिका महायुतीच्या नेत्यांनी घेतली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कृषी व दुग्ध विभागाचा सभापती असताना खेडोपाडी दूध संस्थांची उभारणी करण्यासाठी प्रयत्न केले. गोकुळच्या विकासासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी आमदार राजेश पाटील, नंदाताई बाभूळकर, माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित होते.
चौकट
विरोधकांना टप्पा गाठणे अशक्य
महायुतीच्या मतदारांची संख्या पाहता विरोधकांना विजयासाठी आवश्यक असलेला टप्पा गाठणे अशक्य आहे. त्यामुळे मतदारांनी आपली मते वाया घालवू नयेत. महायुतीच्या सर्व २५ उमेदवारांना मतदान करून विजयी करावे, असे आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
चौकट
मुश्रीफ विजयाचे तंत्र दाखवतील . . .
मंत्री मुश्रीफ गेली २५ ते ३० वर्षे मंत्रिपदावर कार्यरत आहेत. त्यांच्यासमोर राजकारणातील माझा अनुभव सांगणे योग्य नाही. निवडणुका कशा जिंकायच्या, हे मागील जिल्हा परिषद निवडणुकीत साहेबांनी आम्हाला दाखवून दिले. गोकुळच्या निवडणुकीतही ते विजयाचा मार्ग दाखवतील, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.



