*बसवेश्वर जयंती निमित्त बुधवारी विविध कार्यक्रम*
*मोटरसायकल रॅली, व्याख्यान, मिरवणूक, प्रसाद व संगीत संध्या आयोजन*
कोल्हापूर – वीरशैव लिंगायत समाजातर्फे बुधवारी (ता. 30) बसवेश्वर जयंती निमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले असून सकाळी नऊ वाजता युवा आघाडीचा वतीने युवक युवतींची मोटरसायकल रॅली निघणार आहे. चित्रदुर्ग मठापासून सुरू होणारी ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून पुन्हा मठामध्ये विसर्जित होईल. सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत वीरशैव अक्कमहादेवी महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होईल. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन होईल. शैलजा व विनोद सावर्डेकर यांच्या हस्ते महापूजा होईल.
रक्तदान शिबिराचे सुद्धा यावेळी आयोजन केले आहे. सकाळी 11 वाजता युवा वक्त्या प्रज्ञा माळकर यांचे बसवेश्वर जीवन व कार्य व नवीन पिढीची वाटचाल या विषयावर व्याख्यान होईल.
दुपारी बारा वाजता बसवेश्वर जन्मकाळ होईल. सायंकाळी पाच वाजता चार्टर्ड अकॉउंटंट बाळासाहेब व विना साव्यानावर यांच्या हस्ते पालखी पूजन होईल. साडेपाच वाजता चित्रदुर्ग मठापासून मिरवणुकीस प्रारंभ होईल. महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन होईल. आईसाहेब महाराज चौक, महापालिका, गवळी गल्ली, तेली गल्ली, बुरुड गल्ली, शनिवार पोस्ट ऑफिस, टाऊन हॉल या मार्गे पुन्हा ही मिरवणूक दसरा चौकासमोरील चित्रदुर्ग मठामध्ये विसर्जित होईल. रात्री आठ वाजता अक्कमहादेवी मंडपात महाप्रसादाचे आयोजन केले आहे. उद्योजक महेश नष्टे व स्वरूपा नष्टे यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप होईल. रात्री नऊ वाजता अक्कमहादेवी मंडप येथे संगीत संध्या हा सदाबहार,भक्तीगीत, भावगीत, सिने गीतांचा कार्यक्रम होईल.
या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन समाजाचे अध्यक्ष किरण सांगावकर व सचिव सुनील गाताडे यांनी केले आहे.