*श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला १४४५ कोटी रुपयांचा निधी मिळाल्याबद्दल भाजपचा आनंदोत्सव*
कोल्हापूर, प्रतिनिधी
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल १४४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भाजपचे कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी प्राप्त झाला आहे. यासंबंधीची घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेऊन साखर पेढे वाटले.
महालक्ष्मी मंदिर परिसरात हा कार्यक्रम संपन्न झाला.
पहेलगाम येथे झालेल्या पाक पुरस्कृत भ्याड दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर ला यश दिल्याबद्दल करवीर निवासिनी श्री अंबाबाईची साडीचोळी अर्पण करून पूजा करण्यात आली.
यानंतर मंदिर परिसरातील भाविकांना साखर पेढे वाटून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत माहिती देण्यात आली. लवकरच जगतजननी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर परिसराचे रूपडे पालटणार असून काशी विश्वनाथ आणि उज्जैन येथील महाकाल मंदिर कॉरिडॉरच्या धरतीवर कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिराचा विकास होईल असा विश्वास आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला.
गेली अनेक वर्षे चर्चेत असलेला हा विकास आराखडा लवकरच पूर्णत्वाला जाईल आणि दक्षिण काशी कोल्हापूरची ओळख अधिक ठळक होईल असा विश्वास भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी व्यक्त केला.
भूसंपादनासह इतर सर्व कामांना लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होईल आणि तीर्थक्षेत्र विकासा आराखडा पूर्णत्वाला गेल्यानंतर कोल्हापूरच्या समृद्धीमध्ये आणि पर्यटनामध्ये वाढ होईल याची खात्री आहे असे मत आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी, विजय खाडे पाटील, राजसिंह शेळके, भाऊ कुंभार, सुधीर देसाई, आप्पा लाड, विशाल शिराळकर, विनय खोपडे, प्रितम यादव, वैभव कुंभार, विजय अग्रवाल आदी पदाधिकारी उपस्थित होते.