*रस्त्याचे रिस्टोरेशन झाल्याशिवाय पुढील काम करु देणार नाही*
*आमदार सतेज पाटील : गांधीनगर प्रादेशीक नळ पाणी पुरवठा बैठक : कंत्राटदाराला धरले धारेवर*
*गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना आढावा बैठक*
*कोल्हापूर :* रस्त्याच्या रिस्टोरेशनचे काम पूर्ण केल्याशिवाय पुढील काम चालू करू देणार नाही असा सक्त इशारा विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला. गांधीनगर प्रादेशीक नळ पाणी पुरवठ्याचे काम अनेक गावात अर्धवट तर अनेक ठिकाणी संधगतीने सुरूय. त्यामुळे आज सर्किट हाऊस येथील राजर्षी शाहू सभागृहात घेतलेल्या गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना आढावा बैठकीत त्यांनी हा इशारा दिला.
विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 13 गावांच्यासाठी गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना ही महत्वाकांक्षी नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. त्यासाठी 343 कोटी 68 लाख रुपयांचा निधी देखील मंजूर झाला आहे. यामधील पन्नास टक्के रक्कम देखील उचल करण्यात आली आहे. मात्र, या योजनेचे काम अनेक गावात अर्धवट तर अनेक ठिकाणी संथगतीने सुरू आहे. बहुतेक गावात रस्त्याचे रिस्टोरेशन करण्यापुर्वीच पाईप टाकल्या जातात. त्यामुळे ग्रामस्थांना अडचणी येत आहेत. नळ योजनेचे काम सुरू होऊन ३ वर्ष झाली. ३४३ कोटी ६८ लाखाचा निधीतून ४१० किमीची वितरण वाहिनी, ९६ किमीची गुरूत्व वाहिनी तसेच जॅकवेल स्ट्रक्चरसह ३२ टाक्यांचे काम या योजनेतुन करण्यात येणार आहे. कामाची मुदत संपली तरी काम पुर्ण होत नाही. अद्यापही अनेक गावामध्ये कामाचा बोजवारा उडाला आहे. या कामाचा संबंधीत अधिकारी, कंत्राटदार आणि ग्रामपंचायतींचे सरपंच लोकप्रतिनिधी यांच्यासोबत सविस्तर आढावा घेतला. यामध्ये प्रत्येक गावातील किती काम पुर्ण झाले, किती शिल्लक राहिले आहे याची माहिती घेतली गेली. यात मोरेवाडीचे काम ३९ किमी त्यात केवळ २ किमीचे रिस्टोरेशन झाल्याचे सांगण्यात आले. पाचगाव येथील ५ टाक्यांचे काम पुढील मार्च पर्यंत पुर्ण होईल असे सांगण्यात आले. मुडशिंगीचे काम १८ किमी पुर्ण तर २.४ किमी रिस्टोरेशन झाल्याचे सांगण्यात आले. कळंब्याचे १३ किमीपैकी ५ किमी काम पुर्ण तर रस्त्याचे रिस्टोरेशन झालेच नसल्याचे स्पष्ट झाले. गोकुळ शिरगावच्या तीन टाक्यापैकी १ टाकी पुर्ण झाल्याचे सांगण्यात आले. कणेरीवाडीच्या २२ किमी पैकी १३ किमीचे काम पुर्ण झाले याचबरोबरच सरनोबतवाडी, उजळाईवाडी, न्यू-वाडदे वसाहत या ग्रामपंचायतींच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. यावेळी सर्व अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदाराला आमदार पाटील यांनी धारेवर धरले.
दरम्यान, आता रस्त्याच्या रिस्टोरेशनचे काम पूर्ण केल्याशिवाय पुढील काम चालू करू देणार नाही, असा सज्जड इशारा आमदार सतेज पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला. तसेच तुम्ही सर्वांनी कामावर लक्ष द्या, येत्या पंधरा दिवसांनी केलेल्या कामांचा परत आढावा घेवू असे उपस्थित सर्व ग्रामपंचायत संरपंचांना आमदार पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग आणि प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी योजनेमधील अपूर्ण राहिलेल्या वादग्रस्त कामा संदर्भात येत्या सोमवारी बैठक घेण्याचे ठरले.
यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, प्राधिकरणचे डी के पाटील डेप्यूटी इंजिनियर, प्रभाकर गायकवाड, संजय चव्हाण, जगदीश काटकर तर मेघा इंजिनिअरींगचे जनरल मॅनेजर डी सेल्वा मूर्गन, प्रोजेक्ट मॅनेजर मलिक सुतार, मेका शरदचंद्र, नरेश कुमार, नितीन माने, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, प्रकाश पाटील, युवराज गवळी, आनंदा बनकर बाबासो माळी, सचिन पाटील, दिलीप टिपुगडे, सुनिल पोवार, मोरेवाडी सरपंच ए के कांबळे, अमर मोरे,आशिष पाटील, पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील, उचंगाव सरपंच मधुकर चव्हाण, वळिवडे सरपंच रूपाली कुसाळे, गोकुळ शिरगांव सरपंच चंद्रकांत डावरे, साताप्पा कांबळे, किरण आडसूळ, रावसाहेब पाटील, गांधीनगर सरपंच संदीप पाटोळे, प्रताप चंदवाणी, विनोद हजुराणी, न्यु वाडदे वसाहत सरपंच दतात्रय पाटील, कणेरी सरंपच निशांत पाटील अर्जून इंगळे आदी उपस्थित होते.