ई20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या विरोधात
आप ने काढली गाडीची अंत्ययात्रा
पेट्रोल पंपांवर सुरू असलेल्या ई20 पेट्रोलच्या सक्तीच्या विरोधात आम आदमी पार्टीने गाडीची अंत्ययात्रा काढून वीस टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल सक्तीचा विरोध केला. बसंत बहार टॉकीज येथील पेट्रोल पंप येथून सुरु झालेली ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आली. “राम नाम सत्य हैं, आम जनता त्रस्त हैं, नितीन गडकरी मस्त हैं” अशा घोषणा देण्यात यावेळी देण्यात आल्या.
ई20 पेट्रोलमुळे दुचाकी व चारचाकी गाड्यांचे मायलेज ५ ते १५ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. इथेनॉलमुळे इंजिनचे मुख्य भाग खराब होत आहेत आणि गाड्यांच्या दुरुस्तीचा खर्च वाढला आहे.
वाहनांची इंजिने शुद्ध पेट्रोलसाठी डिझाइन केलेली असतात. केंद्र सरकारच्या सध्याच्या धोरणामुळे ग्राहकांना शुद्ध पेट्रोलचा (ई0/ई10) पर्याय मिळत नाही.
इथेनॉलचे उत्पादन स्वस्त असतानाही, ग्राहकांना ई20 पेट्रोल पूर्ण दराने विकावे लागत आहे. यामुळे सामान्य आणि मध्यमवर्गीय जनतेला दुहेरी फटका बसत आहे.
प्रत्येक पेट्रोल पंपावर शुद्ध पेट्रोलचा पर्याय ग्राहकांना त्वरित उपलब्ध करून द्यावा, ई20 पेट्रोलच्या किमती शुद्ध पेट्रोलपेक्षा कमी असाव्यात, ग्राहकाला त्याच्या वाहनानुसार इंधन (ई0, ई10 किंवा ई20) निवडण्याची पूर्ण मुभा असावी, जुन्या वाहनांच्या दुरुस्ती खर्चाची भरपाई द्यावी किंवा वाहनांच्या अधिकृत कंपन्यांनी मोफत दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना द्याव्यात.
सध्याच्या ई20 सक्तीच्या धोरणामुळे करोडो वाहनधारकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येची दखल घेऊन, वाहनधारकांना शुद्ध इंधनाचा पर्याय मिळावा यासाठी त्वरित पाऊल उचलावे असे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आले.
यावेळी आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, किरण साळोखे, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, समीर लतीफ, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, विजय हेगडे, इस्थेर कांबळे, राकेश गायकवाड, संजय नलवडे, दिग्विजय चिले, दिलीप पाटील, प्रथमेश सूर्यवंशी, स्वप्निल काळे, लखन काझी, रमेश कोळी, नाझिल शेख, जुबेर मुजावर, उमेश वडर, रणजित पाटील आदी उपस्थित होते.




