सुट्ट्या खाद्यतेल विक्रीबंदीचा निर्णय सर्वसामान्यांच्या खिशाला झळ देणारा; शासनाने पुनर्विचार करावा : हातकणंगले तालुका व्यापारी महासंघ
पट्टणकोडोली, प्रतिनिधी :
सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर निर्बंध आणून केवळ पाऊच, कॅन अथवा कंपनीचे लेबल असलेल्या नवीन डब्यातूनच खाद्यतेल विक्री करण्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांवर मोठा आर्थिक भार पडणार असल्याची तीव्र चिंता हातकणंगले तालुका व्यापारी महासंघाने व्यक्त केली आहे. या निर्णयाचा फेरविचार करून व्यापारी व ग्राहकहिताचा समतोल साधणारा निर्णय शासनाने घ्यावा, अशी मागणी महासंघाने केली आहे.
महासंघाचे प्रतिनिधी श्रेणीक तेली यांनी सांगितले की, नव्या नियमामुळे ग्राहकांना प्रत्येक वेळी सुमारे १२५ रुपयांचा नवीन डबा खरेदी करावा लागणार आहे. हा अतिरिक्त खर्च सरकार उचलत असेल तर व्यापाऱ्यांची कोणतीही हरकत नाही. मात्र तसे न झाल्यास या निर्णयाचा थेट फटका सर्वसामान्य कुटुंबांना बसणार असून गृहिणींच्या स्वयंपाकघराचा खर्चही वाढणार आहे.
ते पुढे म्हणाले की, तालुक्यातील पारंपरिक तेल व्यापाऱ्यांनी अनेक वर्षे प्रामाणिक व्यवसाय करत ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. व्यापारी अधिकृत उत्पादकांकडून पक्क्या बिलावर, आवश्यक डिक्लरेशन व गुणवत्तेची हमी असलेले खाद्यतेलच खरेदी करून विक्री करतात. त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांकडे संशयाच्या नजरेने पाहणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.
गेल्या पाच-सहा वर्षांत खाद्यतेलाच्या किमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत. त्यातच सणासुदीच्या तोंडावर साखर, गूळ, तांदूळ, दूध यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढले आहेत. अशा परिस्थितीत नव्या नियमामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आणखी आर्थिक ताण येण्याची शक्यता असल्याची चिंता सामान्य ग्राहक व व्यापारी वर्गातून होतं आहे.



