करवीर तालुक्यातील वडणगे मधील देवी पार्वती हायस्कूल मध्ये इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ झाला उत्साहपूर्ण वातावरणात*
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि संघटन कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने शाळांमध्ये इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात येत आहे. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रमच्या वतीने वडणगे मधील देवी पार्वती हायस्कूल मध्ये इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. रोटरीच्या डिस्ट्रीक्ट ३१७० च्या असिस्टंट गर्व्हनर सौ. अरूंधती महाडिक यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकार्यांनी पदग्रहण केले.
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रमच्या वतीने वडणगे मधील देवी पार्वती हायस्कूल मध्ये इंटरॅक्ट क्लब सुरू करण्यात आला आहे. या क्लबचा पदग्रहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रमुख पदग्रहण अधिकारी म्हणून डिस्ट्रिक्ट ३१७० च्या असिस्टंट गव्हर्नर सौ. अरूंधती महाडिक उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते नवनियुक्त इंटरॅक्ट क्लब पदाधिकार्यांनी पदाची जबाबदारी स्वीकारली. इंटरॅक्ट प्रेसिडेंट म्हणून स्वरा विनोद पाटील, इंटरॅक्ट सेक्रेटरी म्हणून श्रेया संभाजी कापसे आणि इंटरॅक्ट ट्रेझरर म्हणून विदिशा संदीप बारले यांनी पदभार स्वीकारला. आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आणि सक्षम नेतृत्व घडवणारे आधारस्तंभ आहेत. इंटरॅक्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सेवाभावी विचारांचा अनुभव मिळेल, असे सौ. अरूंधती महाडिक यांनी सांगितले. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रमचे अध्यक्ष रोटेरियन प्रदीप भारमल, सचिव रोटेरियन अतुल भालेकर आणि खजिनदार रोटेरियन सचिन नंदगांवकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रदीप भारमल यांनी विद्यार्थ्यांना इंटरॅक्ट क्लबची कार्यपद्धती आणि उद्देश याबाबत सविस्तर माहिती दिली. इंटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्याची, संघभावनेने काम करण्याची तसेच शाळा आणि समाजाच्या गरजा ओळखून विविध सेवाभावी उपक्रम राबवण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी करावी आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणावा, असे त्यांनी सांगितले. इंटरॅक्टच्या माध्यमातून समाजसेवा, पर्यावरण संवर्धन, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक जनजागृती यांसारख्या विविध क्षेत्रांत उपक्रम राबवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी रोटरी क्लबकडून त्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाणार आहे. कार्यक्रमाला देवी पार्वती हायस्कूलचे अध्यक्ष तानाजी पाटील, उपाध्यक्ष रघुनाथ पाटील, सचिव विलासराव पवार आणि मुख्याध्यापक राजेश देपणे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रमचे सदस्य सचिन परांजपे, विश्वजीत जाधव, संभाजी जाधव, राहुल राबाडे, प्रसन्न सरदेसाई आणि सिद्धार्थ डुणूंग उपस्थित होते.



