*जिल्हा परिषदेतील गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या*
सदस्यांची अध्यक्षा शिल्पा खोत यांच्याकडे मागणी;
२२ वर्षांची परंपरा खंडित होऊ देणार नसल्याचा निर्धार
कोल्हापूर, दि. २७ : जिल्हा परिषद कार्यालयात गेल्या २२ वर्षांपासून सुरू असलेली गणेशोत्सवाची परंपरा यंदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा परिषद सदस्यांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय तत्काळ मागे घेऊन यंदाही जिल्हा परिषदेत भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा, अशी मागणी सदस्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
जिल्हा परिषद सदस्य शिवाजी जाधव, अतिश शिंगे, इंद्रजीत पाटील, क्रांतिसिंह पवार-पाटील आणि राहुल आवळे यांनी गुरुवारी अध्यक्षा शिल्पा खोत यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी गणेशोत्सवाची २२ वर्षांची परंपरा कोणत्याही परिस्थितीत खंडित होऊ देणार नसल्याचे सदस्यांनी स्पष्ट केले.
निवेदनात म्हटले आहे की, २००४ पासून जिल्हा परिषदेत अत्यंत उत्साहात आणि मांगल्यपूर्ण वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. मात्र यंदा एका तक्रारीच्या अनुषंगाने ही दीर्घकाळाची परंपरा बंद करण्याचा निर्णय झाल्याचे समजते. हा निर्णय खेदजनक असून सांस्कृतिक परंपरेचा सन्मान राखणे आवश्यक आहे.
गणेशोत्सवाला राज्यस्तरीय उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले असताना प्रशासकीय स्तरावरही या उत्सवाला चालना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव रद्द न करता पूर्वीप्रमाणे भक्तिमय वातावरणात साजरा करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी सदस्यांनी केली.
“गेली २२ वर्षे जिल्हा परिषदेत सुरू असलेली गणेशोत्सवाची परंपरा कोणत्याही परिस्थितीत खंडित होऊ देणार नाही. आवश्यक असल्यास गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यासाठी आम्ही सर्व सदस्य एकत्रितपणे पुढाकार घेऊ,” अशी भूमिका सदस्य शिवाजी जाधव यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या विषयावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन यांचीही भेट घेऊन गणेशोत्सव रद्द करण्याच्या निर्णयाबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे सदस्यांनी सांगितले.
हिंदू एकता आंदोलनाकडून सदस्यांचे अभिनंदन
जिल्हा परिषद सदस्यांनी घेतलेल्या या भूमिकेचे हिंदू एकता आंदोलन, कोल्हापूर यांनी स्वागत केले आहे. २२ वर्षांची परंपरा जपण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सर्व संबंधित जिल्हा परिषद सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या प्रयत्नांना श्री गणेश यश देवो, अशी प्रार्थना व्यक्त करण्यात आली आहे.
—



