कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्याच्या सहकार विश्वातील सर्वात मोठ्या संस्थांपैकी एक असलेल्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या सार्वत्रिक निवडणुका पाच वर्षांनी होत आहेत. या निवडणुकीत भाजप महायुती ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’ या नावाने निवडणूक लढवत आहे.
गेल्या काही दिवसांपासून जागावाटपाच्या विषयावर महायुतीतील घटक पक्षांमध्ये मतभेद व मतमतांतरे निर्माण झाली होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे प्रमुख, सर्वांचे मार्गदर्शक व पालक म्हणून मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत चर्चा करून जागावाटपाचा विषय निश्चित करण्यात आला.
या जागावाटपानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ८ जागा आणि राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना १ जागा, अशा एकूण ९ जागा देण्यात आल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला ७ जागा व जनसुराज्य पक्षाला २ जागा, अशा एकूण ९ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. शिवसेनेला ७ जागा देण्यात आल्या आहेत. तसेच, महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व मंत्रिमंडळातील माझे सहकारी हसन मुश्रीफ साहेब करतील.
जागावाटपाबाबत झालेल्या चर्चेनंतर महायुतीतील घटक पक्षांनी समन्वयाने पुढील निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे निश्चित केले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याची भूमिका घ्यावी. आणि ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’च्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी काम करावे, असे या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो.
धन्यवाद.
आपला,
चंद्रकांत दादा पाटील.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.
महाराष्ट्र राज्य.



