कांगोतील शांतिसेनेसाठी निवड झालेल्या सायली दळवींचे समरजितसिंह घाटगे यांनी केले कौतुक
ऑनलाइन संवाद साधून दिल्या शुभेच्छा
कागल, प्रतिनिधी :
करवीर तालुक्यातील चिंचवडे गावच्या कन्या सौ. सायली विक्रम दळवी यांची सीमा सुरक्षा दलाच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेना मिशनअंतर्गत कांगो येथे शांतिसैनिक म्हणून निवड झाल्याबद्दल शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी त्यांच्याशी आनलाईन पद्धतीने संवाद साधून अभिनंदन करत कौतुक केले.
गावच्या मातीतून सुरू झालेला सायली दळवी यांचा प्रवास देशसेवेपासून आता आंतरराष्ट्रीय सेवेकडे पोहोचला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल घाटगे यांनी संवाद साधत त्यांच्या धाडसाचे, जिद्दीचे आणि देशसेवेच्या भावनेचे कौतुक केले. ग्रामीण भागातील मुलींनीही विविध क्षेत्रांत पुढे येऊन आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवावा, यासाठी सायली दळवी यांची कामगिरी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेना मिशनअंतर्गत कांगो येथे सेवा बजावण्याची संधी मिळाल्याने चिंचवडेसह कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. सायली दळवी यांच्या आंतरराष्ट्रीय सेवेसाठी सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. त्यांची पती विक्रम दळवी यांचेही कौतुक केले.
कोट-
सायली दळवी
देशसेवेबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची मिळालेली संधी अभिमानाची आहे. माझ्यासारखी ग्रामीण भागातील महिला जर आफ्रिकेसारख्या देशात जाऊ शकते तर कोल्हापूरच्या महिला जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जाऊ शकतात. त्यांनी मागे राहू नये.
फोटो ओळ -देशसेवेवरून आंतरराष्ट्रीय सेवेकडे झेप घेतलेल्या चिंचवडे (ता. करवीर) येथील सायली दळवी यांच्याशी संवाद साधताना राजे समरजितसिंह घाटगे



