युवराज संभाजीराजे छत्रपती आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची बेंगळुरूमध्ये भेट; २०२७ च्या प्रारंभी पोलंडच्या पंतप्रधानांचा कोल्हापूर दौरा प्रस्तावित

Spread the news

प्रेस नोट
शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६
बेंगळुरू

­

 

युवराज संभाजीराजे छत्रपती आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची बेंगळुरूमध्ये भेट; २०२७ च्या प्रारंभी पोलंडच्या पंतप्रधानांचा कोल्हापूर दौरा प्रस्तावित

  •  

भारत दौऱ्यावर असलेले पोलंड देशाचे प्रधानमंत्री डोनाल्ड टस्क व युवराज संभाजीराजे छत्रपती यांची आज बेंगळुरू येथे विशेष भेट झाली. भारत व पोलंड यांचेमधील ऐतिहासिक मैत्री व सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली.
यावेळी संभाजीराजे यांनी कोल्हापूर – पोलंडच्या ऐतिहासिक संबंधांना उजाळा दिला. इतिहासातील हे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी दोन्ही राष्ट्रांच्या माध्यमातून शैक्षणिक व सांस्कृतिक देवाणघेवाण करण्याबाबत, त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रांमध्ये व्यापार, उद्योग, गुंतवणूक व पर्यटन क्षेत्रांना चालना देण्याबाबत या बैठकीमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली.
संभाजीराजे यांनी प्रधानमंत्री टस्क यांना कोल्हापूर येथे पोलंड मधील उद्योगांचे औद्योगिक हब उभारण्याबाबत आवाहन केले.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडमधून विस्थापित झालेल्या नागरिकांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने दिलेल्या आश्रयाच्या ऐतिहासिक घटनेबद्दल पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी विशेष आस्था व्यक्त केली. मानवता, सहिष्णुता आणि सेवाभाव या मूल्यांचे जतन करणाऱ्या छत्रपती घराण्याच्या योगदानाबद्दल त्यांनी प्रशंसोद्गार काढले. संकटकाळात पोलिश नागरिकांना मिळालेला हा आधार भारत आणि पोलंड यांच्यातील मैत्रीचा एक महत्त्वपूर्ण अध्याय आहे.
या भेटीदरम्यान पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी २०२७ च्या प्रारंभी कोल्हापूरला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. प्रस्तावित ‘वळीवडे म्युझियम फॉर ह्युमॅनिटी अँड पीस’च्या उद्घाटनासाठी कोल्हापूर दौरा करण्याबाबतही त्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली. हा संभाव्य दौरा भारत-पोलंड संबंधांमधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सहकार्याला अधिक चालना देणारा ठरू शकतो.
भारत आणि पोलंड यांच्यातील संबंधांना केवळ ऐतिहासिक मैत्रीपुरते मर्यादित न ठेवता, त्यांना व्यापक सहकार्याची जोड देण्याच्या दृष्टीनेही या भेटीला महत्त्व आहे. वळीवडेच्या ऐतिहासिक वारशातून निर्माण झालेला स्नेहबंध हा भूतकाळातील मानवतावादी कार्याचा गौरवशाली ठेवा असून, भविष्यातील सहकार्याचा भक्कम आधारही आहे. या नात्याच्या बळावर व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अशा विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात.
प्रस्तावित ‘वळीवडे म्युझियम फॉर ह्युमॅनिटी अँड पीस’ हे मानवता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय मैत्रीचे कायमस्वरूपी प्रतीक ठरणार आहे. इतिहासातील या प्रेरणादायी अध्यायाचे जतन करण्याबरोबरच, भावी पिढ्यांना मानवतेच्या मूल्यांची जाणीव करून देणे आणि भारत-पोलंड यांच्यातील परस्पर विश्वास व सांस्कृतिक जवळीक अधिक दृढ करणे, ही या संग्रहालयामागील व्यापक संकल्पना आहे. त्यामुळे हे संग्रहालय दोन्ही देशांमधील ऐतिहासिक नात्याला भविष्यकालीन सहकार्याची जोड देणारा महत्त्वपूर्ण दुवा ठरेल.

या भेटीदरम्यान पोलंडच्या पंतप्रधान कार्यालयाचे प्रतिनिधी आणि भारतातील पोलंडचे राजदूत, पोलंडमधील भारताचे राजदूत तसेच युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे कार्यालय उपस्थित होते.
प्रति,
मा. संपादक सो,
दैनिक / चॅनेल………….
कोल्हापूर

 

कळावे ,
आपला,

अमर पाटील
सचिव
युवराज संभाजीराजे छत्रपती


Spread the news

You may also like

error: Content is protected !!