लोकप्रिय नव्हे,लोकहिताचे निर्णय घेण्याला शाहू कारखान्याचे प्राधान्य-समरजितसिंह घाटगे ऊस विकास योजनेंतर्गत आजअखेर दहा हजारांहून अधिक सभासदांना दोन कोटी दहा लाखांचे अनुदान

Spread the news

लोकप्रिय नव्हे,लोकहिताचे निर्णय घेण्याला शाहू कारखान्याचे प्राधान्य-समरजितसिंह घाटगे

­

 

ऊस विकास योजनेंतर्गत आजअखेर दहा हजारांहून अधिक सभासदांना दोन कोटी दहा लाखांचे अनुदान

  •  

कागल प्रतिनिधी.
सहकारमहर्षी स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या संस्कारानुसार शाहू साखर कारखान्याने सभासद शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत लोकप्रिय निर्णयांपेक्षा लोकहिताचे निर्णय घेण्याची परंपरा जपली आहे,असे प्रतिपादन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.

श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत राबविलेल्या विविध ऊस विकास योजनांच्या लाभार्थी सभासद शेतकऱ्यांना अनुदानाच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.कारखान्याच्या माध्यमातून आजअखेर दहा हजारांहून अधिक सभासदांना दोन कोटी दहा लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

श्री.घाटगे पुढे म्हणाले, स्व. राजे साहेबांप्रमाणेच त्यांच्या पश्चातही ठिबक सिंचनाचा प्रसार करण्यासाठी आम्ही सातत्याने आग्रही आहोत.शाहू कारखान्याने यासाठी ठोस आणि कृतीशील पावले उचलली आहेत. सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीत ठिबक सिंचनाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या संकटाकडे केवळ समस्या म्हणून न पाहता ठिबक सिंचनाचा अवलंब करण्याची संधी म्हणून पाहावे.ऊस उत्पादन वाढीसाठी सध्या चर्चेत असलेले कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान शेतीत प्रभावीपणे राबविण्यासाठी ठिबक सिंचन आवश्यक आहे.शाहू कारखान्याने स्वतंत्र ऊस विकास विभागाच्या माध्यमातून ठिबक सिंचन, एआय तंत्रज्ञान, ड्रोनद्वारे फवारणी,सौर ऊर्जेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. यामुळे ऊस उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच उत्पादकता वाढविण्यास मदत होत असून, त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे.

कार्यक्रमास उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक सचिन मगदूम, संजय नरके, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर शेती अधिकारी दिलीप जाधव यांनी आभार मानले.

चौकट :
शेअर्सच्या रकमेपेक्षाही अधिक अनुदानाचा लाभ!

शाहू साखर कारखान्यामार्फत सभासदांसाठी ऊस विकास व भागविकास निधीतून विविध प्रकारच्या अनुदानाच्या योजना राबविल्या आहेत. या माध्यमातून अनेक सभासद शेतकऱ्यांना त्यांच्या शेअर्सच्या रकमेपेक्षाही अधिक रकमेचे अनुदान मिळाले आहे.सभासदांनी शेअर्सपोटी भरलेल्या १५ हजार रुपयांच्या तुलनेत त्यांना विविध योजनांमधून यापेक्षा अधिक रकमेचा लाभ मिळत असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी दिली. यास सभासदांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली.

छायाचित्र-कागल येथे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास योजनेतील अनुदानप्राप्त लाभार्थी सभासद शेतकऱ्यांसमवेत शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,संचालक सचिन मगदूम,संजय नरके,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!