गोकुळ शिरगावच्या दक्षिण व्हॅलीत रंगणार राज्यस्तरीय अश्वारोहण अजिंक्यपद स्पर्धेचा थरार
३१ ऑक्टोबरपासून तीन दिवस कोल्हापूरकरांना अश्वक्रीडेची मेजवानी
गोकुळ शिरगाव, प्रतिनिधी : अश्वक्रीडेचा समृद्ध वारसा लाभलेल्या कोल्हापुरात घोडेस्वारीतील कौशल्य, वेग आणि चित्तथरारक कसरतींचा अनुभव घेण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. कोल्हापूर इक्वेस्ट्रियन असोसिएशन (केईए) आणि दक्षिण व्हॅली इक्वेस्ट्रियन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील दक्षिण व्हॅलीमध्ये ‘कोल्हापूर हॉर्स शो २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय अश्वारोहण अजिंक्यपद स्पर्धेमुळे कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.
स्टेट इक्वेस्ट्रियन असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष गुणेश पुरंदरे यांनी ही माहिती दिली. या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (ता.३१) रोजी सकाळी आठ वाजता खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी दक्षिण व्हॅलीचे संचालक अच्युत कारंडे,राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे, आंतरराष्ट्रीय रायडर हृदय छेडा, धनंजय महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष पृथ्वीराज महाडिक, शशिकांत थोरात, मोनिका मोहिते, प्रशांत सुर्वे, जैद मुजावर, ऐबल फिलीप, स्वप्निल हिडदुगी, गोरखनाथ सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना श्री. पुरंदरे पुढे म्हणाले,स्टेट इक्वेस्ट्रियन असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या मान्यतेने व सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेत मुंबई, नाशिक, नागपूरसह महाराष्ट्राच्या विविध भागांतील नामांकित अश्वारोहक सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी ८० हून अधिक घोडे आणि अनुभवी स्वार सहभागी होती़.
शनिवार दिनांक३१ ऑक्टोबर ते सोमवार दिनांक २ नोव्हेंबर या तीन दिवसांत स्पर्धा दोन सत्रांत होणार आहेत. सकाळी आठ ते दुपारी बारा आणि दुपारी तीननंतर स्पर्धा संपेपर्यंत अशा वेळापत्रकानुसार विविध अश्वक्रीडा प्रकारांचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेत शो जंपिंग, ड्रेसाज आणि टेंट पेगिंग या तीन प्रमुख अश्वक्रीडा प्रकारांचा समावेश आहे. शो जंपिंगमध्ये अडथळे पार करताना घोडा आणि स्वार यांच्यातील समन्वय, ड्रेसाजमधील शिस्तबद्ध हालचाली, तर टेंट पेगिंगमध्ये वेग आणि अचूकतेची कसोटी पाहायला मिळणार आहे. या रोमांचक स्पर्धांमधून अश्वारोहकांना आपले कौशल्य सिद्ध करण्याची तर करवीरकरांना हा रोमांच पाहण्याची संधी मिळणार आहे.
दक्षिण व्हॅली इक्वेस्ट्रियन सेंटरमध्ये ७० बाय ५० मीटर आकाराचे वाळूचे मैदान विकसित करण्यात आले आहे. सिंचनाची सुविधा असल्याने या मैदानाचा वर्षभर वापर करता येतो. अश्वारोहण प्रशिक्षण आणि स्पर्धांसाठी उपयुक्त असलेले हे मैदान कोल्हापूरच्या क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाची भर घालणारे ठरत आहे. अच्युत कारंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या तीन वर्षांच्या प्रयत्नांतून हे केंद्र साकारले आहे.
नवोदित खेळाडूंना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, अनुभवी अश्वारोहकांना स्पर्धात्मक व्यासपीठ मिळवून देणे आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
यापूर्वीच्या हॉर्स शोंनाही उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर इक्वेस्ट्रियन असोसिएशनची स्थापना २००९ मध्ये झाली. त्यानंतर २०१८ आणि २०१९ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘रॉयल कोल्हापूर हॉर्स शो’ला चांगला प्रतिसाद मिळाला होता. २०२३ मधील हॉर्स शोमध्ये ६५० हून अधिक नोंदी, १२० हून अधिक घोडे आणि २५ हजारांहून अधिक प्रेक्षक सहभागी झाल्याची माहिती आयोजकांनी दिली.
आता राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजनामुळे कोल्हापूरच्या समृद्ध अश्वक्रीडा परंपरेला व्यापक व्यासपीठ मिळणार असून, राज्यातील अश्वारोहण क्षेत्राला नवी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
अश्वारोहण स्पर्धांबरोबरच खाद्यपदार्थांचे स्टॉल, स्थानिक व्यावसायिक आणि जीवनशैलीविषयक ब्रँड्सचे प्रदर्शन, छायाचित्रणाच्या संधी तसेच विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आ़ले आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींसह कुटुंबीय आणि सर्वसामान्य नागरिकांनाही याचा आनंद घेता येणार आहे.कोल्हापूरच्या ऐतिहासिक अश्वक्रीडा परंपरेला आधुनिक सुविधांची जोड देणारा हा हॉर्स शो महाराष्ट्रातील अश्वारोहण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सोबत गोकुळ शिरगाव येथील दक्षिण व्हॅलीचा स्पर्धेचा थरार रंगणाऱ्या मैदानाचा फोटो



