महाधुरळा यू ट्यूब चॅनेलच्या घरगुती गणेशोत्सव देखावा स्पर्धेतून भक्तीसह पर्यावरणचाही गजर

Spread the news

महाधुरळा यू ट्यूब चॅनेलच्या घरगुती गणेशोत्सव देखावा स्पर्धेतून भक्तीसह पर्यावरणचाही गजर

­

 

कोल्हापूर : ‘गणेशोत्सव म्हणजे हर्ष, उल्हास आणि मांगल्याचा उत्सव. या कालावधीत घरोघरी चैतन्य आणि प्रसन्नदायी वातावरण, भावभक्तीचा सोहळा असतो. ‘मूर्ती लहान…पण भक्ती महान’ असलेल्या या उत्सवात महाधुरळा यू ट्यूब चॅनेलतर्फे आयोजित घरगुती गणेशोत्सव देखावा स्पर्धेतून भक्तीसह पर्यावरण आणि प्रबोधनाचाही गजर झाला.’असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

  •  

निमित्त होते, महाधुरळा यू ट्यूब चॅनेलतर्फे आयोजित घरगुती गणेशोत्सव देखावा स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे. महापौर रुपाराणी निकम, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महापालिकेचे उपायुक्त परितोष कंकाळ, महापालिकेतील सभागृह नेते मुरलीधर जाधव, महाधुरळा यू ट्यूब चॅनेलचे संपादक गुरुबाळ माळी, नगरसेविका नेहा तेंडुलकर, सामाजिक कार्यकर्ते अभय तेंडुलकर, दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजेय दळवी, डॉ. प्रविण कोडोलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण समारंभ झाला. शाहू स्मारक भवन येथे बक्षीस वितरण समारंभ झाला. याप्रसंगी स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम केलेले चित्रकार विजय टिपुगडे व प्रा. प्रवीण वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.

महापौर निकम म्हणाल्या, ‘राजकीय बातम्यांचे अचूक वृत्तांकन करण्याची महाधुरळा यू टयूब चॅनेलची खासियत आहे. त्या सोबतच त्यांनी, घरगुती गणेशोत्सव देखावा स्पर्धा आयोजित करुन सामाजिक उपक्रम राबविला. देखावा स्पर्धेच्या माध्यमातून घरोघरी पर्यावरण संवर्धन आणि प्रबोधनाचा गजर झाला.’

स्थायी समिती सभापती शिराळे यांनी, ‘घरगुती गणेशोत्सव देखावा स्पर्धा ही भाविकांच्या आकर्षणाची असते. गणरायची मनोभावे पूजा अर्चा करताना सुंदर देखावे तयार करण्याची कोल्हापुरात परंपरा आहे. अशा स्पर्धेतून सामाजिक उपक्रमांचा जागर होतो हे कोल्हापूरचे वैशिष्ट्य होय.’उपायुक्त कंकाळ म्हणाले, ‘घरगुती गणेशोत्सव म्हणजे मूर्ती लहान पण भक्ती महान. या स्पर्धेला आसपासच्या जिल्ह्यासह गोवा आणि कर्नाटकातील गणेशभक्तांनी सहभाग नोंदविला. यावरुन चॅनेलची लोकप्रियता स्पष्ट होते. तसेच घरगुती गणेशोत्सव देखावा स्पर्धेतून विविध उपक्रमांना चालना मिळते.’ नगरसेविका नेहा तेंडुलकर म्हणाल्या, ‘सामाजिक उपक्रमांची जोड देत उतसव साजरा करण्याची कोल्हापूरकरांची परंपरा आहे. तेंडुलकर कुटुंबीय व आमची संस्था नेहमीच सामाजिक उपक्रमांना बळ देते. या स्पर्धेच्या निमित्ताने गणेशभक्तांच्या भावभक्तीसोबतच कलाकौशल्याला वाव मिळाला.’

महाधुरळा यू ट्यूब चॅनेलचे संपादक गुरुबाळ माळी यांनी प्रास्ताविक करताना ‘महाधुरळा यू ट्यूब चॅनेलतर्फे पहिल्यांदाच घरगुती गणेशोत्सव स्पर्धा आयोजित केल्या होत्या. स्पर्धेसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर येथील गणेशभक्तांनी मोठया संख्येने सहभाग नोंदविला होता. तसेच गोवा, बेळगाव येथील गणेशभक्तांनी स्पर्धेत भाग घेतला होता. जवळपास ७०० स्पर्धकांनी सहभाग घेत घरगुती गणेशोत्सव स्पर्धेला भरभरुन प्रतिसाद दिला. ’दरम्यान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धंकांना बक्षीस देण्यात आली. प्रथम क्रमांकापासून दहाव्या क्रमांकापर्यंतचे विजेत्यांचा गौरव करण्यात आला. तसेच उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात आली.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!