अश्वरोहकांच्या चित्तथरारक कसरतींनी जिंकली प्रेक्षकांची मने टाळ्या-शिट्ट्यांच्या गजरात रंगला दुसऱ्या दिवशी हॉर्स शोचा थरार!

Spread the news

अश्वरोहकांच्या चित्तथरारक कसरतींनी जिंकली प्रेक्षकांची मने

­

 

टाळ्या-शिट्ट्यांच्या गजरात रंगला दुसऱ्या दिवशी हॉर्स शोचा थरार!

  •  

गोकुळ शिरगाव, प्रतिनिधी : गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील दक्षिण व्हॅली इक्वेस्ट्रियन सेंटरमध्ये सुरू असलेल्या ‘कोल्हापूर हॉर्स शो’च्या दुसऱ्या दिवशी अश्वरोहकांच्या चित्तथरारक प्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली. रविवारच्या सुट्टीमुळे स्पर्धेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. उत्साही प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात स्पर्धकांना दाद दिल्याने मैदानावरील वातावरण अधिकच रंगतदार झाले.

कोल्हापूर इक्वेस्ट्रियन असोसिएशन आणि दक्षिण व्हॅली इक्वेस्ट्रियन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा आणि पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी स्पर्धास्थळी भेट देऊन अश्वक्रीडेचा आनंद घेतला.

दिवसभरात विविध वयोगटांत आणि विभागांत ‘१०% किंग’, ‘लान्सर’, ‘टेक युवर लाइन’, ‘बॉल अँड बकेट’, ‘टॉप स्कोअर’ आणि ‘इक्विटेशन’ या प्रकारांतील स्पर्धा पार पडल्या. राज्यभरातून ८० हून अधिक घोडे आणि १५० पेक्षा जास्त अश्वरोहक सहभागी झाले आहेत. कौशल्य, वेग, अचूकता आणि घोड्यावरील नियंत्रण यांचे दर्शन घडविणाऱ्या स्पर्धांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

अश्वक्रीडा करिअरची संधी म्हणून पहा : पुरंदरे

अश्वक्रीडा हा केवळ हौसेचा खेळ नसून करिअरची मोठी संधी असल्याचे मत इक्वेस्ट्रियन असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष गुणेश पुरंदरे यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, या खेळाचा आशियाई आणि ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये समावेश आहे. विद्यार्थ्यांना खेळासाठी ग्रेस गुण दिले जातात, तसेच नोकरीमध्येही विशेष राखीव कोट्याची तरतूद आहे. पूर्वी अश्वक्रीडेच्या प्रशिक्षणासाठी मुंबई, पुणे आणि नाशिकसारख्या शहरांत जावे लागत होते. आता ही सुविधा कोल्हापुरात उपलब्ध झाली आहे.स्थानिक खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा.

चौकट १ : लाखमोलाचे अश्व; किंमत कोटीपर्यंत!

या स्पर्धेत देशी आणि विदेशी जातींचे घोडे सहभागी झाले आहेत. मारवाडी , काठियावाडी, सिंधी आणि पंजाबी या भारतीय जातींसह ‘थॉरोब्रेड’ आणि ‘वॉर्मब्लड’ या विदेशी जातींचे घोडे आकर्षण ठरत आहेत.अश्वक्रीडेसाठी वापरण्यात येणाऱ्या घोड्यांची किंमत साधारणतः २० लाखांपासून एक कोटी रुपयांपर्यंत आहे. घोड्यांच्या आहाराचीही विशेष काळजी घेतली जाते. उच्च प्रतीचा हरभरा, गहू-भुसा आणि बार्ली दिली जाते. विदेशी घोड्यांना सुके गवत, तर भारतीय वंशाच्या घोड्यांना हिरवे गवत खाऊ घातले जाते.

चौकट २ : आजच्या स्पर्धेतील विजेते

कशिश बजाज, अच्युत कारंडे, पार्थ ठोंबरे, सानवी नाळे, संस्कृती रणदिवे, स्वयं संचेती, साईशा ढोबळे, स्वराज राजे, अनिकेत कांबळे, ज्योतिरादित्य सुर्वे, गोरखनाथ सूर्यवंशी, आर्यवीर घाटगे, आहाना देशमुख, भैय्या घाला, समर्थ राजपूत, नवनाथ कांगणे आणि ऋत्विक नलवडे यांनी विविध विभागांत यश मिळविले.

छायाचित्र ओळी :
१. गोकुळ शिरगाव येथे हॉर्स शो स्पर्धेतील विजेत्या आर्यवीर घाटगे यांना बक्षीस वितरण करताना राजे प्रवीणसिंह घाटगे.
२. कोल्हापूर हॉर्स शोमधील अश्वरोहकांच्या कौशल्याचा एक थरारक क्षण.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!