शहरातील समस्या सोडवण्यासाठी कालबद्ध आराखडा राबवावा – आमदार अमल महाडिक यांचे महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश*

Spread the news

*शहरातील समस्या सोडवण्यासाठी कालबद्ध आराखडा राबवावा – आमदार अमल महाडिक यांचे महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश*
कोल्हापूर शहरातील विविध विषयांसंदर्भात कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक के मंजूलक्ष्मी यांच्यासमवेत कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी व्यापक आढावा बैठक घेतली. या बैठकीत जवाहर नगर खणभाग,बिजली चौक, निर्माण चौक येथील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड देण्यासंदर्भात आमदार अमल महाडिक यांनी विचारणा केली. यावर उत्तर देताना प्रशासकांनी नगररचना विभागासोबत पत्रव्यवहार सुरू असून लवकरच प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लागेल असे सांगितले. कोल्हापूर शहराच्या उपनगरांमधील ओपन स्पेस विकसित करण्यासंदर्भात आराखडा बनवण्याच्या सूचना आमदार महाडिक यांनी दिल्या. त्याचबरोबर शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यासंदर्भात शहर वाहतूक शाखेसोबत संयुक्त बैठक घ्यावी. बंद अवस्थेतील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी स्वतंत्र सक्षम यंत्रणा उभारावी अशा सूचना आमदारांनी केल्या. शहरातील प्रमुख चौक अतिक्रमण मुक्त करण्याबरोबरच सुशोभीकरणासाठी विकास आराखडा तयार करावा. प्रायोगिक तत्त्वावर हॉकी स्टेडियम चौक विकसित करण्यासाठी आमदार निधीतून निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही आमदार महाडिक यांनी दिली. नगरोत्थानमधून मंजूर झालेल्या रस्त्यांचे काम लवकरात लवकर सुरू करावे. महानगरपालिकेच्या शाळांसाठी स्वतंत्र बजेट हेड तयार करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अनुकूलता दर्शवली आहे. हा प्रस्ताव तातडीने तयार करावा अशा सूचना महाडिक यांनी केल्या. महानगरपालिकेच्या जलतरण तलावांमध्ये दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात काय धोरण ठरवले आहे? अशी विचारणा महाडिक यांनी केली. यावर शहर अभियंता रमेश मस्कर यांनी अंबाई जलतरण तलावासाठी विकास आराखडा बनवला असून लवकरच त्याचे सादरीकरण केले जाईल असे सांगितले. शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या संकलनासाठी आणखी टिपर खरेदी करण्यासाठी महानगरपालिकेने प्रस्ताव सादर करावा, शासन स्तरावरून यासाठी निधी उपलब्ध केला जाईल अशी ग्वाही अमल महाडिक यांनी दिली. त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन आणि प्रक्रिया प्रकल्पासाठी स्वतंत्र जागा निवडावी. जास्तीत जास्त कचऱ्यावर प्रक्रिया करून शहर कचरामुक्त करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना महाडिक यांनी केल्या.
शहराचा भविष्यात होणारा विस्तार लक्षात घेऊन ड्रेनेज लाईन, कचरा उठाव आणि पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासंदर्भात शासन स्तरावर निधीसाठी पाठपुरावा करू असा विश्वास आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला.
सरस्वती टॉकीज येथील बहुमजली पार्किंग मुळे पार्किंगची समस्या काही अंशी कमी झाली आहे. याबद्दल त्यांनी महापालिकेचे अभिनंदन केले. अशाच पार्किंग व्यवस्था शहरात अन्य ठिकाणी सुरू करण्यासंदर्भात त्यांनी सूचना केल्या.
पुढील 50 वर्षांचा विचार करून शहराचा विकास आराखडा लवकरात लवकर तयार करण्याचे निर्देश आमदार महाडिक यांनी दिले.
या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगररचना विभागाचे एन एस पाटील यांच्यासह महानगरपालिकेचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

 

 

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!