सिनेमा समाजबदलाचे मोठे माध्यम : विश्वास सुतार* *चिल्लर पार्टीचा तेरावा वर्धापन दिन वाड्यावस्त्यांतील साडेतीनशे मुलांसोबत*

Spread the news

*सिनेमा समाजबदलाचे मोठे माध्यम : विश्वास सुतार*

*चिल्लर पार्टीचा तेरावा वर्धापन दिन वाड्यावस्त्यांतील साडेतीनशे मुलांसोबत*

*बालचित्रपटानंतर टाउन हॉल बाग संग्रहालय, शाहू महाराज समाधीस्थळ, गंगाराम कांबळे स्मारकाला भेट*

 

  •  

कोल्हापूर : सिनेमा समाजबदलाचे मोठे माध्यम आहे. वाचन, लेखन, गणित याबरोबरीनेच सांस्कृतिक प्रगतीही महत्वाची आहे,असे प्रतिपादन शाहुवाडी तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार यांनी केले.

जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील चांदोली अभयारण्याजवळील वाड्यांमधील १९ शाळांमधील साडेतीनशे शाळकरी विद्यार्थ्यांनी रविवारी राजर्षी शाहू महाराज यांचे समाधीस्थळ पाहिले. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी गंगाराम कांबळे स्मारकाला भेट दिली आणि त्यानंतर टाउन हॉल बागेतील संग्रहालयाची माहिती घेतली. तत्पूर्वी चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीचा तेरावा वर्धापन दिन शाहू स्मारक भवनात पार पडला. या मुलांनी ‘मुफासा’ या सिनेमाचा आनंद घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुतार बोलत होते. ते म्हणाले, चिल्लर पार्टी ज्याप्रमाणे समाजाची सेवा करते त्याप्रमाणेच मोठे झालात की तुम्हीही सेवा करावी. यावेळी प्राचार्य जी. पी. माळी, केंद्र प्रमुख मारुती गुरव, शाहू स्मारक भवनाचे व्यवस्थापक दत्तात्रय नांगरे उपस्थित होते. या कार्यक्रमात शोन संजय शिंदे, गजानन बकरे, संजय सावंत, समीर शेख, प्रणिती शाह आदींचा चिल्लर पार्टीचे ‘सिनेमा पोरांचा’ हे पुस्तक भेट देउन विशेष सत्कार करण्यात आला.

शाहूवाडी आणि राधानगरी तालुक्यातील ज्या वाड्यांवस्तीतील सुमारे १९ शाळांमधील मुले आली होती, त्यांच्या शिक्षकांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. या शाळांतील विद्यार्थ्यांना वह्याही भेट देण्यात आल्या. मिलिंद यादव यांनी सूत्रसंचालन केले. या मुलांना वह्या, सुग्रास भोजन आणि आईस्क्रीमचीही भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन बबन बामणे, ओंकार कांबळे, नसीम यादव, अर्शद महालकरी, अनिल काजवे, विजय शिंदे, शैलेश चव्हाण, सुधाकर सावंत, आरती कोपार्डेकर, देविका बकरे, शिवप्रभा लाड, गुलाबराव देशमुख यांनी केले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!