*डॉ. सुनीलकुमार लवटे विचारमंचच्या सभेत ‘वंदे मातरम’वर चर्चा*
कुरूंदवाड शाळेतील विद्यार्थी वाढीबाबतही उहापोह
कोल्हापूर डाॅ. सुनीलकुमार लवटे विचार मंचच्या मासिक बैठकीत ‘वंदे मातरम’ आणि कुरूंदवाड कुमार विद्या मंदिर नं. ३ या शाळेतील विद्यार्थी वाढीच्या यशस्वी प्रयोगाबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ. बी. एम. हिर्डेकर होते.
मंचचे सहसचिव दीपक जगदाळे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात कार्याध्यक्ष डॉ. विश्वास सुतार यांनी विचार मंचचे कार्य, उद्देश आणि पहिल्या सभेबाबतची माहिती विषद केली. यावेळी कुमार विद्या मंदिर कुरुंदवाड नं ३ या शाळेचे मुख्याध्यापक रविकुमार पाटील यांचा ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानात कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक आल्याबद्दल ग्रंथ ,शाल व रोप देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पाटील यांनी या शाळेचा पट ३०-३५ वरुन १२१७ पर्यंत नेण्यासाठी सलग१८ वर्षे कसकसे प्रयत्न केले आणि त्याला आलेल्या यशाची मांडणी केली. शाळेचा एक मजला शिक्षकांनी स्वतच्या पैशातून बांधल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण यांनी ‘वंदे मातरमचा इतिहास’ या विषयावर मार्गदर्शन केले. बंकिमचंद्र चटोपाध्याय/चॅटर्जी यांचे लेखन आणि वंदे मातरमची वाढत गेलेली चळवळ, इंग्रजांचे फोडा व झोडा हे धोरण आणि हिंदू मुस्लिम यांच्यात वाढवलेली दरी, बंगालची फाळणी असा सारा इतिहास त्यांनी डोळ्यासमोर उभा केला. ‘वंदे मातरम्’ चे सध्या सुरू असलेले राजकारण आणि त्यामागील कारणमीमांसा यावरही त्यांनी भाष्य केले.
संदीप मगदूम, उमेश सुर्यवंशी, जाॅर्ज क्रूझ यांनीही मते मांडली. आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. बी.एम्. हिर्डेकर यांनी रविकुमार पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले आणि शाळा पाहायची इच्छा व्यक्त केली. विचार मंच मधील प्रत्येक व्यक्ती कशी वेगवेगळी भूमिका पार पाडत आहे याचा सार सांगितला. डॉ. इस्माईल पठाण यांच्या मार्गदर्शनातील प्रमुख मुद्यांवर आपली भूमिका मांडली. यशवंती शिंदे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी सर्व मंच सदस्यांना ‘प्रांजळाचे आरसे’ हा बृहद ग्रंथ डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्यावतीने भेट देण्यात आला. यावेळी डॉ. जी. पी. माळी, प्रभाकर हेरवाडे, प्रा. टी. के. सरगर, संजय कळके, अमेय जोशी, चंद्रकांत निकाडे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
*फोटो
डाॅ. सुनीलकुमार लवटे विचार मंचच्या बैठकीत डॉ. ईस्माईल पठाण यांचा डॉ. बी. एम. हिर्डेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रविकुमार पाटील, दीपक जगदाळे उपस्थित होते.



