अमली पदार्थांविरोधात दोन महिन्यांत समूळ उच्चाटनाची ग्वाही; जिल्हा पोलिस प्रमुख निलोत्पल यांचे आश्वासन.

Spread the news

कोल्हापूर ( प्रतिनिधी)
जिल्ह्यातील तरूण-तरूणी सध्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाच्या विळख्यात अडकत चाललेली असून त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील काही भागात गुन्हेगारीची परिस्थिती नियंत्रणा बाहेर गेली आहे. यामध्ये प्रामुख्याने गांजा, भांग, चरस, हेरॅाईन , ब्राऊन शुगर , मेथाम्फेटामाइन ,अफू आणि कोकेन यांचा समावेश असून येत्या दोन महिन्यात या सर्वांचे जिल्ह्यातून समूळ उच्चाटन करण्यात येईल अशी ग्वाही जिल्हापोलिस प्रमुख निलोत्पल यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळास दिली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हापोलिस प्रमुख यांना अमली पदार्थ विक्रीवर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी जिल्हाध्यक्ष अजित पोवार यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील शाळा , कॅालेज व तरूण मंडळे , औद्योगीक वसाहतीमधील परप्रांतिय तरूण ही अमली पदार्थाच्या विक्री करण्याचे प्रामुख्याने ठिकाणे झालेली आहेत. शहरी भागातील तरूणाई झपाट्याने या विळख्यात अडकल्यानंतर आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात तरूण -तरूणी या व्यसनात अडकविण्याचा प्रकार जोरात सुरू आहे.
शहरातील व गावातील अमली पदार्थ विक्री करणारी सर्व पाळेमुळे पोलिस यंत्रणेला माहित आहेत. विशेषता १५ ते १६ वर्षांचा तरूण यामध्ये अडकला जात असून प्रत्येक गावात शेकडो तरूण याचे बळी पडलेले आहेत. भविष्यात तरुणांना या व्यसनापासून मुक्त करण्याचे मोठे आव्हान समाजासमोर असणार आहे.जिल्ह्यामध्ये होत असलेले खून , चोरी , दरोडा , अपहरण , तरूणांच्या मध्ये होत असणारे गॅंगवार , वेगवेगळ्या शर्यत्यामध्ये अमली पदार्थ सेवन करून होणारे वाद सर्रास सुरू आहेत.
यावेळी बोलताना जिल्हापोलिस प्रमुख निलोत्पल म्हणाले कि , कोल्हापूर जिल्ह्यात ज्या ठिकाणाहून अमली पदार्थाची विक्री होत आहे त्याची सखोल माहिती घेतली जाईल. या सर्व प्रकाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी हेल्पलाईन नंबर सुरू करून पोलिस यंत्रणा सतर्क केली जाणार आहे. सध्या यामध्ये कार्यरत असलेल्या प्रमुख मंडळींची माहिती घेण्यात येत आहे. ज्या पोलिस अधिकारी यांच्याकडून याबाबत कारवाई केली जाणार नाही त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती दिली.
यावेळी कार्याध्यक्ष डॅा. बाळासाहेब पाटील , जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे , भिमगोंडा पाटील , बाजीराव पाटील , विशाल चौगुले , दिग्वीजय सुर्यवंशी , ॲड. संदीप चौगुले , अच्युत कुलकर्णी , तात्यासो देशमुख , नितेश कोगनोळे, जय पाटील यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.

­

 

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!