अभियांत्रिकी प्रवेशाच्या शंकांना पूर्णविराम; केआयटीचा मोफत मार्गदर्शन कार्यक्रम
करिअरच्या संधी, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती आणि आरक्षणाबाबत तज्ज्ञांचे सविस्तर मार्गदर्शन
कोल्हापूर, दि. : बारावीनंतर अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर घडविण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना प्रवेश प्रक्रियेची अचूक, अद्ययावत व सर्वांगीण माहिती उपलब्ध करून देण्यासाठी केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या वतीने रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी ‘अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या संधी व प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया-२०२६’ या विषयावर विशेष विनामूल्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी १० वाजता आनंद भवन, सायबर कॉलेज, कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे.
यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी केआयटीच्या शैक्षणिक गुणवत्ता, उद्योग-सहभाग, संशोधन व आंतरराष्ट्रीय सहकार्य उपक्रमांचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, गेल्या ४३ वर्षांपासून गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणाची परंपरा जपणारे केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय हे एनबीए आणि नॅक मानांकनासह केंद्र शासनाकडून ‘एम्पॉवर्ड ऑटोनॉमी’ दर्जा प्राप्त करणाऱ्या अग्रगण्य संस्थांपैकी एक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या अनुषंगाने उद्योगाभिमुख, कौशल्याधारित आणि संशोधनकेंद्रित शिक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील स्पर्धात्मक वातावरणासाठी सक्षम बनविण्यावर विशेष भर दिला जात आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ प्रवेश प्रक्रियेची माहितीच नव्हे, तर भविष्यातील करिअरच्या दृष्टीने योग्य शाखा निवडण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा सायन्स, मशीन लर्निंग, सायबर सुरक्षा, रोबोटिक्स, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या करिअर आणि रोजगाराच्या संधींबाबत सखोल माहिती दिली जाणार आहे.
कार्यक्रमात प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया-२०२६ मधील प्रत्येक टप्प्याचे सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन नोंदणी, कागदपत्र पडताळणी, प्राधान्यक्रम निवड (Option Form Filling), केंद्रीकृत प्रवेश फेरी (CAP Round), जागावाटप प्रक्रिया, प्रवेश निश्चिती आणि आवश्यक कागदपत्रे यांची सखोल माहिती दिली जाणार आहे. याशिवाय विविध शिष्यवृत्ती योजना, शासकीय आर्थिक सवलती, आरक्षण धोरण, ईबीसी व इतर शुल्क सवलती, तसेच विद्यार्थिनींसाठी उपलब्ध विशेष शासकीय लाभ याविषयीही तज्ज्ञ मार्गदर्शन मिळणार आहे.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता व प्रवेश प्रक्रिया प्रमुख डॉ. महेश शिंदे यांनी सांगितले की, “अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालकांच्या मनात अनेक प्रश्न, शंका आणि संभ्रम असतात. योग्य माहितीअभावी अनेक विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधींपासून वंचित राहतात. या पार्श्वभूमीवर प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक बाब स्पष्ट करून विद्यार्थ्यांना योग्य शाखा, योग्य महाविद्यालय आणि योग्य करिअर निवडण्यासाठी सक्षम करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.”
संस्थेचे सचिव श्री दीपक चौगुले व वरिष्ठ विश्वस्त श्री सुनील कुलकर्णी हे या पत्रकार परिषदेस उपस्थित होते. पत्रकारांशी झालेल्या प्रश्नोत्तराच्या सत्रात त्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थी, पालक आणि करिअरविषयक मार्गदर्शन घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी हा कार्यक्रम पूर्णतः विनामूल्य असून बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केआयटीच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी प्रा. अमर टिकोळे डॉ निवास पाटील व प्रा.अमित वैद्य उपस्थित होते.



