गजानन नागरी पतसंस्थेने कमवलेली विश्वासार्हता कौतुकास्पद
विभागीय सहनिबंधक महेश कदम यांचे प्रतिपादन
कोल्हापूर
सहकार चळवळ वाढायची असेल तर विश्वासार्हता अतिशय महत्त्वाची असते, याच विश्वासार्हतेच्या जोरावर श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेने सभासदांमध्ये आपुलकी निर्माण केली. त्यामुळेच ती आज पाचव्या शाखेच्या माध्यमातून शिखरावर पोहोचली आहे असे उद्गार विभागीय सहनिबंधक महेश कदम यांनी काढले.
श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेच्या संभाजीनगर येथील पाचव्या शाखेचे उद्घाटन श्री. कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक गुरुबाळ माळी होते.
विभागीय सहनिबंधक कदम म्हणाले, 36 वर्षापूर्वी भिशीच्या माध्यमातून सुरुवात झालेल्या श्री गजानन नागरी पतसंस्थेने आज तब्बल 85 कोटी रुपये ठेवी जमवत मोठा टप्पा पार केला आहे. चांगली सेवा आणि विश्वास या जोरावरच त्यांची ही वाटचाल झाली आहे. सभासदांनी विश्वास दाखवल्यामुळेच संस्थेची मोठी प्रगती झाली आहे.
पत्रकार माळी म्हणाले, सहकारात सध्या विश्वासार्हता अतिशय महत्त्वाची आहे. हीच विश्वासार्हता गजानन पतसंस्थेने दाखवल्यामुळेच सहकारात एक आदर्श आणि प्रेरणादायी संस्था म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे.
प्रारंभी पतसंस्थेचे अध्यक्ष किरण पाटोळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी पतसंस्थेचे संस्थापक आर.बी. पाटोळे, उपाध्यक्ष प्रकाश पाटोळे, प्रभारी जनरल मॅनेजर नंदकिशोर तोरलेकर याशिवाय संचालक, सभासद, हितचिंतक उपस्थित होते.
या कार्यक्रमात बचत गटाच्या महिलांना कर्ज वाटप करण्यात आले. उद्घाटनाच्या दिवशीच तब्बल दोन कोटीच्या ठेवी जमा झाल्या. काही ठेवीदारांना पावत्या देण्यात आल्या. शेवटी प्रा. सुनील भोसले यांनी आभार मानले.