जागर : सण उत्सव अंतर्गत गावरान भाजी संवर्धन महोत्सव
कोल्हापूर
हॉटेल मालक संघटना, कोल्हापूर, निसर्ग मित्र परिवार, अवनि संस्था, कोल्हापूर केटरर्स वेल्फेअर असोसिएशन व स्वयंसिद्धा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागर सण उत्सव २०२५ अंतर्गत गावरान भाजी संवर्धन महोत्सव व प्रदर्शन-विक्री आयोजित करण्यात आली आहे, ही माहिती हॉटेल मालक संघाचे सचिन शानबाग, उज्वल नागेशकर, साताप्पा मोहिते व अनिल चौगुले यांनी पत्रकार बैठकीत दिली. हा महोत्सव 20 ऑगस्ट रोजी ताराराणी चौक येथील हॉटेल अयोध्या( वृंदावन गार्डन) येथे सकाळी 11 ते सायंकाळी सहा या दरम्यान होणार आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन परसबाग निर्मिती करणाऱ्या शेळकेवाडी येथील आजी श्रीमती अक्काताई गंगाराम शेळके यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या महोत्सवाचा मुख्य उद्देश गावरान भाज्यांचे संवर्धन, प्रचार-प्रसार तसेच लोकांपर्यंत पौष्टिक अन्नाचा संदेश पोहचवणे हा आहे. पारंपरिक अन्नसंस्कृती जपण्यासाठी आणि स्थानिक शेतकरी, महिला बचतगट तसेच स्वयंपाक व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळावे याकरिता हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
या महोत्सवात विविध प्रकारच्या वृक्ष, वेली, झुडपे आणि तन इत्यादी गावरान भाज्यांचे नमुने ठेवण्यात येणार आहे. गावरान भाज्यांचे थेट शेतातून विक्री केंद्र, पारंपरिक पदार्थांची चव चाखण्याची संधी, तसेच माहितीपर प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.
नागरिकांनी मोठ्या संख्येने हॉटेल अयोध्या ताराराणी चौक दि.२०/८/२०२५ रोजी सकाळी ११ ते ६ या वेळेत उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.