*कळंबा कारागृहासाठी १४ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर; आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश*
कळंबा
येथे असलेले कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृह पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे कारागृह म्हणून ओळखले जाते. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेले गुन्हेगार या कारागृहात शिक्षा भोगत आहेत. राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने कैदी कळंबा कारागृहात आणले जातात. या कारागृहात कैद्यांसाठी असलेले बरॅक, स्वच्छतागृह, भोजन विभाग आणि इतर व्यवस्थेवर ताण पडत असल्यामुळे कारागृहाचा विस्तार करण्याची मागणी कारागृह प्रशासनाकडून करण्यात आली होती. या मागणीचा पाठपुरावा आमदार अमल महाडिक यांनी राज्य सरकारकडे केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन कळंबा कारागृहाच्या विस्तारीकरणासाठी निधी देण्याची मागणी आमदार महाडिक यांनी केली होती.
या मागणीची तातडीने दखल घेत गृहमंत्रालयाने राज्यातील १० कारागृहांमध्ये नवीन बरॅक उभारणी, कैदी मुलाखत कक्ष, स्वच्छतागृह बांधणे, सुरक्षा भिंत उभारणी तसेच खुले कारागृह उभारणे अशा विविध कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.
यामध्ये कळंबा कारागृहाचा समावेश करण्यात आला असून कळंबा कारागृहामध्ये १५० बंदी क्षमतेचे खुले कारागृह उभारण्याला मान्यता देण्यात आली आहे.
लवकरच या खुल्या कारागृहाच्या उभारणीला सुरुवात होणार आहे. कळंबा कारागृहाच्या वाढत्या बंदी संख्येमुळे कारागृह प्रशासनावर पडणारा अतिरिक्त ताण यामुळे कमी होईल असा विश्वास आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला.
राज्यभरातील कारागृहासाठी ५७ कोटी रुपयांहून अधिक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आभार मानले आहेत.