कोल्हापूरचा सांस्कृतिक आत्मा पुन्हा नव्या तेजाने उजळणार…!
आज कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अभिमान असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाची महापौर सौ. रूपाराणी निकम, महापालिकेचे अधिकारी आणि संबंधित यंत्रणेसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली.
आगीत या ऐतिहासिक वास्तूचे मोठे नुकसान झाले, पण कोल्हापूरची संस्कृती, कला आणि इतिहास कधीच राख होऊ शकत नाही. त्या वैभवाला पुन्हा उभारी देण्याचे काम आज वेगाने सुरू असून, प्रत्येक काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावे यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. गरज भासल्यास शासनाकडून अधिक निधी उपलब्ध व्हावा यासाठीही ठामपणे पाठपुरावा करू.
या नाट्यगृहाशी आमच्या घाटगे घराण्याचे अतूट आणि भावनिक नाते आहे. संस्थान काळात या भव्य वास्तूच्या उभारणीची जबाबदारी माझे पंजोबा पिराजीराव घाटगे यांनी सांभाळली होती. त्यामुळे आज या वास्तूच्या पुनर्जन्माचा प्रवास प्रत्यक्ष अनुभवताना मन अभिमानाने भरून आले. हा क्षण माझ्यासाठी केवळ पाहणीचा नव्हता, तर पूर्वजांनी जपलेल्या सांस्कृतिक वारशाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा होता.
कला, संस्कृती आणि इतिहास यांचा सन्मान जपत विकासाचा मार्ग अधिक भक्कम करण्याचा आमचा संकल्प कायम आहे.
लवकरच या रंगमंचावर पुन्हा पडदा उघडेल, कलाकारांच्या कलाविष्काराला दाद मिळेल, टाळ्यांचा कडकडाट घुमेल आणि कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभवाला नवसंजीवनी मिळेल… हाच विश्वास, हाच निर्धार!
“वारसा जपणारे हातच भविष्य घडवतात!”