महादेवीला परत आणण्याच्या हालचालींना गती; अमित शहा यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीमध्ये बैठक ;खासदार धैर्यशील मानेंच्या प्रयत्नांना यश”
रुकडी,ता.६ :
नांदणी (ता. शिरोळ) येथील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाची महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीण परत आणण्यासाठी केंद्र व राज्य शासन स्तरावर हालचालींना गती मिळाली असून, या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली.या बैठकीत शिवसेनेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.
दरम्यान ,या बैठकीत महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याचे स्पष्ट निर्देश गृहमंत्री अमित शहा यांनी संबंधित यंत्रणांना दिले.त्यामुळे खासदार धैर्यशील माने यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.
दरम्यान,या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात वनतारा संस्थेच्या सीईओंना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून, खासदार माने यांच्या पुढाकाराने बैठक घेण्यात आली होती.या चर्चेनंतर वनतारानेही सकारात्मक भूमिका घेतली. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे मंगळवार (दि.५ ) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली या बैठकीमध्ये खासदार धैर्यशील माने यांनी सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र शासनासोबत पुनरावलोकन याचिकेत स्वतः वनताराने मठाच्या बाजूने पक्षकार व्हावे अशी मागणी केली होती.या मागणीलाही सकारात्मक प्रतिसाद देत वनताराने पक्षकार होण्यास संमती दर्शविली आहे.तसेच नांदणी मठामध्ये हत्तीणीच्या संगोपनासाठी आवश्यक ती सुरक्षायंत्रणा उभारण्याने व वैद्यकिय सेवा देण्याचा निर्णयही वनताराने घेतल्याची माहिती खासदार माने यांनी दिली. बैठकीस खासदार नरेश मस्के,खासदार मिलिंद देवरा, खासदार संदिपान भुमरे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे,खासदार रवींद्र वायकर उपस्थित होते.