देशभरात सुरू असलेल्या सांसद खेल महोत्सवाची उत्साहात सांगता, पेठवडगावच्या आदर्श गुरुकुलमध्ये समारंभाचे ऑनलाईन प्रक्षेपण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खेळाडूंना प्रेरणादायी मार्गदर्शन
खेळाडूंनी जिद्दीने आणि चिकाटीने आपली गुणवत्ता वाढवावी, भाजप आणि महाडिक परिवार त्यांना पाठबळ देईल, पृथ्वीराज महाडिक यांची ग्वाही
खेळाडूंनी जिद्द आणि चिकाटीने खेळ करत, आपली गुणवत्ता वाढवावी आणि राज्य-राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवावा. खेळाडूंना महाडिक परिवार आणि भाजपकडून आवश्यक सहकार्य करू, अशी ग्वाही धनंजय महाडिक युवाशक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांनी दिली. पेठवडगाव इथल्या आदर्श गुरुकुल विद्यालयामध्ये सांसद खेल महोत्सव सांगता समारंभ प्रसंगी ते बोलत होते. देशभरात सुरू असलेल्या सांसद खेल महोत्सवाचा समारोप समारंभ ऑनलाईन प्रक्षेपणाद्वारे सादर करण्यात आला. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील खेळाडूंना मार्गदर्शन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या सांसद खेल महोत्सवाचा समारोप करण्यात आला. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या आदर्श गुरुकुल विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये सांसद खेल महोत्सवाचा सांगता समारंभ ऑनलाईन पध्दतीनं प्रसारीत करण्यात आला. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत खेळाचे महत्त्व, शिस्त आणि राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. खेळाडूंनी आयुष्यात शिस्त पाळणे महत्वाचे आहे. खेळाच्या मैदानात दाखवलेला संयम आणि एकाग्रता विद्यार्थ्यांच्या बौध्दीक विकासासाठी आवश्यक असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमुद केले. खेळाडूंनी स्थानिक पातळीवर न थांबता ऑलिंपिक सारख्या स्पर्धांमध्ये देशाचे नाव उज्वल करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले. यावेळी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशकथांचा अनुभव मांडला. देशभरातून एक कोटीहुन अधिक खेळाडू सांसदखेल महोत्सवात सहभागी झाले होते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली हा महोत्सव पार पडला. जिल्ह्यातून हजारो खेळाडूंनी २९ खेळांमध्ये आपला सहभाग नोंदवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या महोत्सवाअंतर्गत, ग्रामीण भागातील खेळाडूंना आपले क्रीडा कौशल्य सिद्ध करण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ मिळाले, त्याचा अभिमान असल्याचे प्रतिपादन धनंजय महाडिक युवाशक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉक्टर डी एस घुगरे, शिवाजी विद्यापीठाचे मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य सिद्धार्थ शिंदे, क्रीडा समन्वयक शिवाजी पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेती राष्ट्रीय खेळाडू कल्याणी पाटील, वैष्णवी पाटील, राष्ट्रीय खेळाडू प्रणव जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. या समारंभाला आदर्श गुरूकुल विद्यालयाच्या सचिव आणि मुख्याध्यापिका एम. डी. घुगरे, ग्रीन व्हॅली स्कूलचे मुख्याध्यापक व्ही. एस. डोईजड, मनोहर परीट, नरेंद्र कुपेकर, एस. एस. मदने, आर. के. डोंबे, सांसद खेल समन्वयक उमेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.



