ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या वतीने मुलींच्या वसतिगृह बांधण्यात येणार आहे.
बुधवारी संस्थेच्या आवारात वसतिगृहाचा पायाभरणी समारंभ पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी खासदार शाहू छत्रपती यांची उपस्थिती होती.तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च व
तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. सोसायटीचे सचिव मालोजीराजे छत्रपती, सुरेश शिंदे,
अजय पाटील, भगवानराव साळुंखे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, मुलींसाठी शिक्षण अधिक सुलभ व परवडणारे करण्यासाठी
शासन कटिबद्ध असून विविध उपक्रम राबवले जात आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या वाढवण्यासाठीही
प्रयत्न सुरू आहेत. २०१४ साली राज्यातील विद्यार्थी संख्या १४ लाख होती, ती वाढून सध्या ४३ लाखांपर्यंत
पोहोचली आहे. याच कालावधीत मुलींची संख्या १४ लाखांवरून १६ लाखांपर्यंत वाढली आहे, ही बाब
समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, अनेक अभ्यासक्रमांमध्ये मुलींसाठी ट्युशन फी पूर्णपणे माफ करण्यात आली असून परीक्षा शुल्कही १०० टक्के
माफ करण्यात आले आहे. या निर्णयांमुळे उच्च शिक्षणात मुलींचा सहभाग वाढीस लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खासदार शाहू छत्रपती यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, आजच्या काळात वसतिगृह ही केवळ निवासाची
सुविधा नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेली एक महत्त्वपूर्ण व्यवस्था आहे.
दरम्यान, संस्थेच्या वतीने नव्या वसतिगृहाचे आधुनिक डिझाइन साकारण्यात आले असून, जात-धर्माचा भेद न करता
सर्वांना शिक्षण देण्याची परंपरा संस्था सातत्याने जपत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मुलांचे वसतिगृह होणे
आवश्यक होते, त्या कार्याला आज सुरुवात झाली. वसतिगृह बांधताना केवळ भिंती उभारल्या जाणार
नाहीत, तर विविध सुविधांची उपलब्धता देखील असणार आहे. शाहू महाराजांनी दिलेल्या शिक्षणाचा
वसा जपतांना आपल्याला विविध क्षेत्रांचा विकास करायचा आहे. मात्र, तो विकास केवळ संख्यात्मक
नको तर गुणात्मक हवा असावा,” मत खासदार शाहू छत्रपती यांनी मांडले.
संस्थेचे मानद सचिव मालोजीराजे छत्रपती यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत गुणवत्तापूर्ण शिक्षणावर दिला
जाणारा भर अधोरेखित केला. सध्या संस्थेशी सुमारे १९ हजार विद्यार्थी आणि १२०० हून अधिक शिक्षक व
कर्मचारी जोडले गेले असून, प्रवेश दर ५७ टक्क्यांहून अधिक असल्याची माहिती त्यांनी दिली.




