नवापूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय आढावा बैठक संपन्न

Spread the news

*नवापूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय आढावा बैठक संपन्न*

­

 

नवापूर, दि. 14 ऑगस्ट 2026 : नवापूर जिल्हा: नंदुरबार येथे आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. बैठकीच्या प्रारंभी उपविभागीय अधिकारी यांनी प्रास्ताविक करून तालुक्यातील विविध विभागांच्या कामकाजाची रूपरेषा मांडली. त्यानंतर संबंधित विभागांच्या तालुकाप्रमुखांनी आपापल्या विभागाचा सविस्तर आढावा सादर केला.

  •  

बैठकीदरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विविध शासकीय योजना व नागरिकांशी संबंधित महत्त्वाच्या विषयांचा सविस्तर आढावा घेतला. संजय गांधी योजना व इतर सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांना अनुदान वेळेवर मिळते किंवा नाही, याबाबत त्यांनी विचारणा करून पात्र लाभार्थ्यांना अनुदान वेळेत मिळण्याची कार्यवाही सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच; मातोश्री पाणंद रस्ते योजना व मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना याबाबत माहिती घेऊन संबंधित कामांना गती देण्याच्या सूचना करण्यात आल्या.

पुरवठा विभागाचा आढावा घेताना तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना वेळेवर व अचूकपणे धान्याचा पुरवठा होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ग्रामविकास विभागाच्या आढाव्यात घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांची संख्या, पूर्ण झालेली घरकुले तसेच; प्रलंबित घरकुलांची माहिती घेण्यात आली. घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या मोफत रेती बाबतही त्यांनी माहिती घेतली.

कृषी विभागाचा आढावा घेताना तालुक्यात किती क्षेत्रावर विविध पिकांची पेरणी झाली आहे, याबाबत माहिती घेण्यात आली. शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार खताचा सुरळीत व पुरेसा पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सहकार विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना कर्जमाफीच्या लाभार्थ्यांना आवश्यक सहकार्य करून पात्र लाभार्थ्यांचे कामकाज प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने साथीचे आजार उद्भवू नयेत तसेच उद्भवल्यास त्यावर तातडीने नियंत्रण मिळविता यावे, यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक ती पूर्वतयारी ठेवावी, तसेच पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या.

या आढावा बैठकीस आमदार शिरीषकुमार नाईक, जिल्हाधिकारी मिताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित, प्रतिभा शिंदे, नगरपालिकेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या माध्यमातून तालुक्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेऊन नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ वेळेत व प्रभावीपणे मिळावा, विकासकामांना गती मिळावी आणि प्रशासनाने नागरिकाभिमुख पद्धतीने कामकाज करावे, यावर विशेष भर देण्यात आला.

शेवटी उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी, पदाधिकारी व संबंधितांचे आभार मानून तालुकास्तरीय आढावा बैठकीची सांगता करण्यात आली.
=======


Spread the news

You may also like

error: Content is protected !!