निर्यात नियमांनुसार घेतलेले हलाल प्रमाणपत्र; त्याबाबत पसरविण्यात येणारी माहिती दिशाभूल करणारी – गोकुळची अधिकृत भूमिका
कोल्हापूर,ता.२७ : अलीकडे सोशल मीडियावर गोकुळ दूध संघाच्या हलाल प्रमाणपत्रासंदर्भात दिशाभूल करणारी माहिती व गैरसमज पसरविले जात असल्याच्या, पार्श्वभूमीवर गोकुळ प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. संघाकडून स्पष्ट करण्यात आले की, हलाल प्रमाणपत्र हे कोणत्याही धार्मिक प्रचार, सक्ती किंवा विचारसरणीशी संबंधित नसून आंतरराष्ट्रीय व्यापारातील एक आवश्यक व्यावसायिक व गुणवत्तेशी संबंधित आहे. ‘हलाल’ या शब्दाचा अर्थ ‘वैध’ किंवा ‘परवानगी असलेला’ असा असून, खाद्यपदार्थांच्या उत्पादन प्रक्रियेत कोणतेही प्रतिबंधित किंवा भेसळयुक्त घटक वापरलेले नाहीत, याची खात्री या प्रमाणपत्राद्वारे केली जाते.
गुणवत्ता तपासणीची प्रक्रिया
डेअरी उद्योगात लोणी, चीज, श्रीखंड, तूप, मिल्क पावडर यांसारख्या उत्पादनांमध्ये वापरले जाणारे घटक यांचे काटेकोरपणे तपासले जातात. दुग्धजन्य पदार्थांमध्ये वापरले जाणारे घटकसुद्धा हलाल मानांकनानुसार असल्याची खात्री या प्रक्रियेत केली जाते. त्यामुळे हे प्रमाणपत्र FSSAI, ISO 22000 आणि HACCP प्रमाणेच गुणवत्ता व सुरक्षितता सुनिश्चित करणारे मानक मानले जाते.
निर्यात आणि आंतरराष्ट्रीय नियम
गोकुळ दूध संघामध्ये हलाल प्रमाणपत्र प्रणालीची अंमलबजावणी दि.१५/१०/२०१८ पासून करण्यात आली आहे. सध्या या प्रमाणपत्राची वैधता मार्च २०२८ पर्यंत आहे. गल्फ देशांसह अनेक इस्लामिक राष्ट्रांमध्ये खाद्यपदार्थ आयातीसाठी हलाल प्रमाणपत्र असणे कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य आहे. विशेषतः सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, ओमान, कतार आणि कुवेत यांसारख्या देशांमध्ये हलाल प्रमाणपत्राशिवाय कस्टम क्लिअरन्स मिळत नाही.
गोकुळची निर्यात कामगिरी
गोकुळ दूध संघाने सन २०१८ मध्ये तुर्कीये, जॉर्जिया, सिरीया, बांग्लादेश व यूएई येथे सुमारे ८५० मेट्रिक टन दूध पावडर निर्यात केली होती. तसेच सन २०२४ मध्ये अझरबैजान येथे ४६२ मेट्रिक टन लोणी निर्यात करून नवीन बाजारपेठ विकसित केली आहे. सध्या मध्यपूर्व देशांमध्ये भारतीय दर्जेदार लोणी, तूप व इतर दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी असून संघाच्या मार्केटिंग विभागाला सातत्याने चौकशा (enquiries) प्राप्त होत आहेत.
इतर दूध संघांचाही समान दृष्टिकोन
देशातील प्रमुख सहकारी दूध संघ यांनी देखील गल्फ देशांमध्ये निर्यात करण्यासाठी हलाल प्रमाणपत्र स्वीकारले आहे. त्यामुळे हे प्रमाणपत्र उद्योग क्षेत्रात सर्वमान्य व्यावसायिक आवश्यकता बनले आहे.
शेतकऱ्यांसाठी आर्थिक लाभ
निर्यात व्यवहार परकीय चलनात होत असल्याने संघाला अधिक आर्थिक लाभ मिळतो. याचा थेट फायदा दूध उत्पादकांना अधिक सेवा सुविधा, चांगला दर आणि संघाची आर्थिक क्षमता वाढविण्यासाठी होतो. सध्याच्या रुपयाच्या अवमूल्यनाच्या पार्श्वभूमीवर निर्यात वाढविणे हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरत आहे.
गोकुळ दूध संघाने घेतलेले हलाल प्रमाणपत्र हे केवळ निर्यात वाढ, जागतिक बाजारपेठेत प्रवेश, परकीय चलन प्राप्ती आणि दूध उत्पादकांचे हित लक्षात घेऊन घेतलेले व्यावसायिक पाऊल आहे.त्यामुळे या विषयाकडे केवळ आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक असून, कृपया कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊन नये व पसरवू नयेत, असे आवाहन गोकुळ प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.





