सिंधुदुर्गच्या भूमीत फुलणार ग्रामीण उद्योजकतेचा नवा अध्याय
‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाचा दिमाखदार शुभारंभ!
कुडाळ / सिंधुदुर्ग दि. १७ (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शाश्वत आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील तरुण हातांना रोजगारासोबतच मालकी हक्काची नवी दिशा दाखवण्यासाठी ‘गाव तिथे उद्योजक’ या महत्त्वपूर्ण अभियानाचा भव्य प्रारंभ करण्यात आला आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री मा. ना. नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथे पार पडला.
प्रत्येक गावाचा आर्थिक कणा मजबूत करणे आणि स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य ध्यास आहे. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या या संकल्पनेबद्दल बोलताना रविंद्र माणगावे म्हणाले की, “ग्रामीण महाराष्ट्रात अथांग क्षमता आणि कौशल्य दडलेले आहे. ‘गाव तिथे उद्योजक’ हे केवळ एक अभियान नसून प्रत्येक गावात नवीन उद्योजक घडवून ग्रामीण अर्थव्यवस्था थेट मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे एक क्रांतिकारी पाऊल आहे.” कोकण विभागात उपाध्यक्ष डॉ. संतोष राणे यांच्या विशेष पुढाकारातून हे अभियान सिंधुदुर्गात पोहोचले आहे.
शासनाचे भक्कम पाठबळ आणि सहकार्याची ग्वाही
स्थानिक युवकांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आणि गावपातळीवरील उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्य शासन पूर्ण ताकदीने पाठीशी उभे राहील, असा विश्वास या प्रसंगी देण्यात आला.
अभियानाच्या उद्घाटनावेळी बोलताना पालकमंत्री मा. ना. नितेश राणे म्हणाले, “ग्रामीण भागातील तरुणांना उद्योजकतेकडे वळवणे आणि स्थानिक संसाधनांवर आधारित उद्योग उभे करणे काळाची गरज आहे. ही मोहीम कोकणाच्या आर्थिक समीकरणांना नवी ताकद देईल आणि या अभियानाला राज्य शासनाकडून आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल.”
या सोहळ्याला महाराष्ट्र चेंबरचे ट्रस्ट बोर्ड अध्यक्ष आशिष पेडणेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्षा डॉ. धनश्री हरदास, सुनिता फाल्गुने यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी, गव्हर्निंग कौन्सिल मेंबर्स आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभियानामुळे सिंधुदुर्गातील ग्रामीण युवकांना व्यावसायिक मार्गदर्शन, तंत्रज्ञान आणि बाजारपेठ मिळणे सुलभ होणार असून जिल्ह्याच्या विकासाला एक नवी गती मिळणार आहे.



