हजारो बालचित्रकारांची स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांना जयंतीनिमित्त रंगरेषांतून मानवंदना

Spread the news

*हजारो बालचित्रकारांची स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांना जयंतीनिमित्त रंगरेषांतून मानवंदना*

­

 

*रौप्यमहोत्सवी वर्षी उच्चांकी साडे पाच हजार विद्यार्थ्यांचा सहभाग*

  •  

कागल, प्रतिनिधी :
शाहू उद्योग समूहाचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७८ व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत हजारहून अधिक बालचित्रकारांनी आपल्या कल्पनाशक्तीला रंगांची सुंदर उधळण करत भावविश्व रेखाटत रंगरेषांतून मानवंदना दिली.सलग पंचविसाव्या वर्षी आयोजित या स्पर्धेला साडे पाच हजार विद्यार्थ्यांचा सहभागानिशी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना प्रणित छत्रपती शाहू कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कागल, मुरगूड, सेनापती कापशी आणि कणेरी (ता. करवीर) या चार ठिकाणी एकाचवेळी स्पर्धा पार पडल्या.कागल येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल, मुरगूड विद्यालय, न्यायमूर्ती रानडे विद्यालय (सेनापती कापशी) आणि काडसिद्धेश्वर विद्यालय (कणेरी) येथे विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.

पहिली ते तिसरी, चौथी ते पाचवी, सहावी ते सातवी, आठवी ते दहावी, मूकबधिर (पहिली ते चौथी व पाचवी ते दहावी) तसेच मतिमंद विद्यार्थी अशा सात स्वतंत्र गटांत स्पर्धा घेण्यात आल्या.परीक्षक म्हणून प्रा. बबन सावंत, दत्तात्रय चौगुले, मिलिंद देसाई आणि रितेश माने यांनी काम पाहिले.

कागल येथे बोलताना ‘शाहू’चे संचालक युवराज पाटील म्हणाले,राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कलेला दिलेले प्रोत्साहन स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी कृतीतून पुढे नेले. त्यांच्या पश्चात कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. या स्पर्धेतील विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवून कागलचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास आहे.

स्वागतपर मनोगतात,कार्यकारी संचालक व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र चव्हाण म्हणाले,स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त २००२ पासून सुरु,झालेली स्पर्धा आता त्यांच्या जयंतीनिमित्त होत आहे.सुरुवातीला केवळ कागलपुरत्या मर्यादित असलेल्या या स्पर्धा विद्यार्थी व पालकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे आज चार केंद्रांवर आयोजित केल्या जात असून, ग्रामीण भागातील बालचित्रकारांसाठी त्या प्रभावी व्यासपीठ ठरत आहेत.

स्पर्धेच्या प्रारंभी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे तसेच स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी ‘शाहू’चे संचालक सचिन मगदूम, सतीश पाटील, राजे बँकेचे संचालक राघू हजारे, बाबासाहेब मगदूम, प्रवीण कुराडे, नगरसेवक बाळासाहेब माळी, सुशांत कालेकर,शाहू कृषीचे उपाध्यक्ष सुदर्शन मजले,शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रशासन अधिकारी एम. व्ही. वेस्वीकर आदी उपस्थित होते.
आभार मुख्याध्यापक एस.डी.खोत यांनी मानले.

छायाचित्र ओळ :
कागल :येथे श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलमध्ये स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७८ व्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ‘शाहू’चे संचालक युवराज पाटील,सचिन मगदूम,सतीश पाटील,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण व अन्य मान्यवर.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!