राजा शिवाजी चित्रपटाच्या विशेष शोद्वारे अनोखा वाढदिवस साजरा
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचे संस्थापक डॉ. प्रवीण कोडोलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त बालकल्याण संकुल व उमेद फौंडेशनच्या मुले तसेच वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा विशेष शो उत्साहात संपन्न झाला. डीवायपी येथील पीव्हीआरमध्ये पार पडलेल्या या उपक्रमास विजय देवणे, संजय पवार, रिपब्लिकन पक्षाचे उत्तमदादा कांबळे, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेविका दिपाली घाटगे सरकार, योगिता कोडोलीकर, नगरसेवक अभिजीत खतकर, पद्मजा तीवले, युवराज कदम, शुभम शिरहट, मंजीत माने, निलेश बनसोडे, अजिंक्य शिंदे, प्रकाश गाताडे, किशोर माने, अनिल लव्हेकर, वसंत डावरे, सुशील भांदिगरे, महेश राठोड, विराज सुतार, राजेश घाटगे, योगेश कांबळे, विनायक सुतार, ऋतुराज माने व बालकल्याण संकुल तसेच उमेद फौंडेशनचे पदाधिकारी व सेवक वर्ग….. व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल मान्यवरांची मनोगते पार पडली यामध्ये संजय पवार म्हणाले, वाढदिवस म्हणजे केवळ औपचारिक शुभेच्छांचा दिवस नसून समाजातील वंचित मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे माध्यम असू शकते, हे या उपक्रमातून दिसून आले. ‘राजा शिवाजी’ सारख्या प्रेरणादायी चित्रपटाच्या माध्यमातून मुलांमध्ये इतिहास आणि संस्कार रुजविण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.
उत्तमदादा कांबळे म्हणाले, “आजच्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि पराक्रम पोहोचविण्यासाठी अशा सांस्कृतिक उपक्रमांची गरज आहे. डॉ. प्रवीण कोडोलीकर यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक जाणीव जपत राबविलेला हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरेल.
ऋतुराज क्षीरसागर म्हणाले, बालकल्याण संकुलातील तसेच वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी आनंद, प्रेरणा आणि संस्कार यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम समाजात सकारात्मक संदेश देणारा आहे. सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याची ही संकल्पना निश्चितच अभिनंदनास पात्र आहे.
प्रयोदी सोशल अँड कल्चरल फाउंडेशन, वाढदिवस समिती तसेच संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान विचारेमाळ मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, इतिहास आणि प्रेरणादायी कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे मनोगत शाहीर रंजीत कांबळे यांनी व्यक्त केले.
चित्रपट पाहताना उमेद फौंडेशनचे व बालकल्याण संकुलातील मुले आणि वीटभट्टी कामगारांच्या मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चित्रपटातील ऐतिहासिक प्रसंगांमुळे मुलांमध्ये उत्सुकता आणि प्रेरणा निर्माण झाल्याचे दिसून आले.
कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा आणि समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत डॉ. प्रवीण कोडोलीकर यांचा विशेष सत्कार करून शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाचे औचित्य साधत समाजातील वंचित घटकांतील मुलांसाठी आनंदाचा क्षण निर्माण करणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.
डॉ. प्रवीण कोडोलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यंदाचा चित्रपट शो उपक्रमही सामाजिक जाणीव आणि संस्कार जपणारा ठरल्याची माहिती आयोजकांनी दिली.




