वळसंग गांधी नगर येथे पारंपरिक गणेश मंडळाची परंपरा कायम
वळसंग : गांधी नगर येथील युवा गणेश मंडळ सन 1992 पासून अखंडितपणे गणेशोत्सवाचे आयोजन करीत असून आजही “नवसाला पावणारा गणपती” म्हणून गावभर ख्यातनाम आहे. गेल्या तीन दशकांत अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्याची जिवंत उदाहरणे आजही चर्चेत आहेत.
दरवर्षी गणरायाचे आगमन मोठ्या भक्तीभावाने होत असून मंडळाला ग्रामस्थांचे उत्स्फूर्त सहकार्य मिळते. या मंडळाची खासियत म्हणजे याचे अध्यक्षपद कोणाकडे नसून सर्व कार्यकर्तेच मिळून मंडळाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडतात.
मंडळामध्ये विशेषतः महिलांचा सहभाग उल्लेखनीय आहे. महिला वर्ग दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवतो. यात भजन-कीर्तन, आरती स्पर्धा, हरितगृह व स्वच्छता मोहिमा, मुलांसाठी शैक्षणिक खेळ तसेच सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असतो. त्यामुळे हा उत्सव फक्त धार्मिकच नव्हे तर सामाजिक भान जागवणारा ठरतो.
युवा गणेश मंडळाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे गावातील सर्व १८ पगड जातींचा सहभाग. असतो आणि प्रत्येकांना आरतीची माणकरी म्हणुन सहकुटुंबास सहभागी आरतीस बोलावले जाते जातिभेद बाजूला ठेवून सर्व समाज एकत्र येऊन ११ दिवस गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज होतात आणि संपूर्ण कार्यक्रम एकजुटीने पार पाडतात.
भक्तांच्या अनुभवांनुसार, गणरायाच्या कृपेने नोकरी, आरोग्य व व्यवसायात यश मिळाल्याचे प्रसंग वारंवार घडले आहेत. “नवसाला पावणारा गणपती” हीच मंडळाची खरी ओळख बनली आहे.
गावातील तरुणाई देखील या उत्सवाशी निगडीत असून गणेशोत्सवातून एकता, भक्ती आणि समाजकारणाचा संदेश दिला जात आहे. त्यामुळे युवा गणेश मंडळ हे वळसंगच्या सांस्कृतिक जीवनातील एक महत्त्वाचे केंद्र ठरले आहे.