*आज (दि.25) जिल्ह्यात महावितरणचे ‘ग्राहक समाधान शिबिर’*
*कोल्हापूर, दि. 24ऑगस्ट 2026:* स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या मनातील शंका, प्रश्न आणि गैरसमज दूर करण्यासाठी महावितरणच्या कोल्हापूर मंडलातर्फे दर महिन्याच्या मंगळवारी ग्राहक समाधान शिबिर आयोजन करण्यात येते. जिल्ह्यातील महावितरणच्या सर्व उपविभागीय कार्यालयांच्या स्तरावर सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर आयोजित केले जात असून, ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या वीजविषयक तक्रारी व शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन कोल्हापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी केले आहे.
स्मार्ट मीटरच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची माहिती अधिक सहज आणि तात्काळ उपलब्ध होत आहे. त्यामुळे दैनंदिन वीज वापरावर लक्ष ठेवणे आणि त्यानुसार वीज वापराचे नियोजन करणे ग्राहकांना शक्य होत आहे. तसेच मीटर रीडिंगची प्रक्रिया स्वयंचलित झाल्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन बिलिंग प्रक्रियेत अधिक अचूकता व पारदर्शकता येत आहे. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून ग्राहकांना वीज वापराचे योग्य नियोजन करण्याची संधी मिळत असून, दिवसाच्या वेळेत केलेल्या वीज वापरासाठी ८५ पैसे प्रतियुनिट सवलतीचा लाभ मिळत आहे. स्मार्ट मीटरच्या या विविध सुविधांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविणे तसेच त्यांच्या मनातील गैरसमज दूर करणे हा ग्राहक समाधान शिबीराचा प्रमुख उद्देश आहे.
या ग्राहक मेळाव्यांमध्ये केवळ स्मार्ट मीटरशी संबंधित प्रश्नच नव्हे, तर वीजबिल, वीजपुरवठा, ग्राहकांच्या नावात बदल, मीटरसंबंधी तक्रारी तसेच अन्य वीजविषयक समस्यांवरही संबंधित अधिकारी व कर्मचारी ग्राहकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना आपल्या तक्रारींसाठी आवश्यक ते मार्गदर्शन व कार्यवाही एकाच ठिकाणी मिळणार आहे. आज मंगळवार (दि.25) रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हे ग्राहक समाधान शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत.
*तक्रार असल्यास स्मार्ट मीटरसोबत चेक मीटरचीही सुविधा – अधीक्षक अभियंता*
स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत शंका किंवा तक्रार असलेल्या ग्राहकांच्या समाधानासाठी महावितरणने विशेष उपाययोजना केली आहे. अशा ग्राहकांच्या ठिकाणी स्मार्ट मीटरसोबत चेक मीटर बसविण्यात येणार आहे. दोन्ही मीटर सिरीजमध्ये जोडून पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत दोन्ही मीटरचे रीडिंग ग्राहकांच्या उपस्थितीत घेण्यात येईल. यामुळे स्मार्ट मीटरबाबत असलेले गैरसमज दूर होऊन ग्राहकांचा विश्वास व स्वीकारार्हता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी व्यक्त केला.
—————



