**प्रसिद्धी पत्रक (Press Note)**
*तात्काळ प्रसिद्धीसाठी*
*दिनांक:* ०९ जुलै २०२६
*स्थळ:* कोल्हापूर
*शाहूंच्या पुरोगामी कोल्हापुरात अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या श्वेता जुमानींवर गुन्हे दाखल करा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार!*
*– पुरोगामी पक्ष व संघटना, कोल्हापूर जिल्ह्याचा जिल्हाधिकार्यांना इशारा*
*कोल्हापूर:*
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी, विवेकवादी आणि वैज्ञानिक विचारसरणीच्या कोल्हापूर भूमीत ‘श्वेता जुमानी’ (अंकज्योतिषी) यांच्या वतीने आगामी १५ जुलै ते १८ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या अंधश्रद्धाळू व अवैज्ञानिक कार्यक्रमांना तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पुरोगामी पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीने मा. जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी यांना निवेदन देऊन या कार्यक्रमावर त्वरित बंदी घालण्याची आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात बोलताना *भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौन्सिल सदस्य सतीशचंद्र कांबळे* म्हणाले की, “शाहू महाराजांच्या कोल्हापूर शहरात असंवैधानिक आणि अवैज्ञानिक सोशल मीडिया वर जे दावे चालू आहेत, ते पुरोगामी कोल्हापूरला लांछनास्पद आहेत. याचे सर्व पुरावे आम्ही निवेदनासोबत जोडले आहेत. त्यामुळे श्वेता जुमानी यांच्यावर ‘औषध आणि चमत्कारिक उपचार (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४’, ‘महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायदा २०१३’ आणि ‘माहिती व तंत्रज्ञान कायदा (IT Act)’ नुसार पोलिसांनी ताबडतोब गुन्हे दाखल करावेत.” त्यांनी पुढे असाही इशारा दिला की, जर त्यांनी असे दावे करणे आणि कोल्हापुरात येणे थांबवले नाही, तर त्या ज्या ठिकाणी थांबतील, तिथे तीव्र निदर्शने व ठिया आंदोलन करण्यात येईल.
या प्रसंगी महिला आघाडीच्या नेत्या *सीमा पाटील** यांनी सांगितले की, काही चित्रपटांच्या आणि अभिनेत्यांच्या नावामध्ये बदल केल्यामुळे ते सिनेमे सुपर डुपर हिट झाल्याचा अजब दावा श्वेता जुमानी यांच्याकडून केला जात आहे, जो अत्यंत चुकीचा आहे. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांचा देखील अपमान झालेला आहे.
*अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शहर अध्यक्ष आनंद माने* म्हणाले की, “एका जाहीर कार्यक्रमात कोल्हापूरच्या नावामध्ये बदल केला तर कोल्हापूरची देखील भरभराट होईल, असा विचित्र दावा कोल्हापूरचा इतिहास-भूगोल माहीत नसणाऱ्या या श्वेता जुमानीने केला होता, जे अत्यंत आक्षेपार्ह आहे.”
*निवेदनातील प्रमुख कायदेशीर मुद्दे आणि मागण्या:*
*संविधानाचे उल्लंघन:* नावातील अक्षरे बदलणे (Name Correction), भाग्यवान क्रमांक किंवा ग्रहांच्या खड्यांद्वारे आरोग्य व आजारपण बरे करण्याचे दावे करणे हे भारतीय संविधानातील कलम ५१ अ (h) (वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास करणे) चे थेट उल्लंघन आहे.
*कायदेशीर कारवाईची मागणी:** विशिष्ट ‘रेमेडीज’ आणि उपचारांचे दावे करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याने त्यांच्यावर ‘महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायदा २०१३’ व ‘औषध आणि चमत्कारिक उपचार कायदा १९५४’ अंतर्गत त्वरित एफआयआर (FIR) दाखल करण्यात यावा.
*संघटित आर्थिक लूट:* या तथाकथित मार्गदर्शनासाठी सर्वसामान्य जनतेकडून ₹१४,१००/- २७४००/- ते तब्बल ₹३३,०००/- पर्यंत अवाजवी शुल्क आकारून कोल्हापूरकरांची आर्थिक लूट केली जात आहे, यावर तात्काळ रोक लावावी.
*सायबर पोलिसांना आदेश:* सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवरून केल्या जाणाऱ्या या अवैज्ञानिक जाहिरातींवर सायबर पोलिसांनी तात्काळ बंदी आणावी.
शाहूंच्या कोल्हापुरात अशा ढोंगी आणि अंधश्रद्धाळू प्रवृत्तींना पायबंद घालणे हे प्रशासन आणि पुरोगामी चळवळीचे कर्तव्य आहे. प्रशासनाने १५ ते १८ जुलै दरम्यानच्या या कार्यक्रमांवर त्वरित बंदी न आणल्यास ‘पुरोगामी पक्ष व संघटना, कोल्हापूर जिल्हा’ यांच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा या प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आला आहे. यावेळेस सीमा पाटील, स्मिता पानसरे,सतीशचंद्र कांबळे गीता हसुरकर, बिजली कांबळे, चंद्रकांत यादव,अतुल दिघे, रवी जाधव, उत्कर्ष पवार, इर्शाद फरास, दिलदार मुजावर, रघुनाथ कांबळे,किरण गवळी प्राध्यापक तेजस्विनी देसाई मॅडम, रमेश वडणगेेकर, प्रकाश जाधव आदी कार्यकर्ते हजर होते.




