करिअर नियोजना पासून प्रवेश प्रक्रिये पर्यंत; केआयटीने दिला विद्यार्थी-पालकांना आत्मविश्वास
अभियांत्रिकी क्षेत्रातील अमर्याद संधी आणि प्रवेश प्रक्रियेबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन
कोल्हापूर, दि. ७ जून : आजच्या स्पर्धात्मक युगात योग्य करिअरची निवड आणि प्रवेश प्रक्रियेतील अचूक मार्गदर्शन ही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या संधी व प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया-२०२६’ या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व इतर शेजारील भागांतील शेकडो विद्यार्थी आणि पालकांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रा. श्रुती काशीद यांनी प्रास्ताविक, अतिथी परिचय व सूत्रसंचालन केले. संस्थेचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सचिन मेनन,विश्वस्त श्री. सुनील कुलकर्णी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यात पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करताना उपाध्यक्ष श्री. सचिन मेनन म्हणाले, “बदलत्या काळातील करिअरच्या नव्या वाटा समजून घेत पालकांनी विद्यार्थ्यांच्या आवडी, क्षमता आणि स्वप्नांना पाठबळ द्यावे. योग्य संधी मिळाल्यास आजची तरुण पिढी जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करू शकते.” संस्थेचा संघर्षमय प्रवास, मूल्याधिष्ठित शिक्षणाची परंपरा आणि विद्यार्थीकेंद्री दृष्टिकोन यांची माहिती विश्वस्त श्री. सुनील कुलकर्णी यांनी दिली. केआयटीच्या यशस्वी वाटचालीमागील प्रेरणादायी प्रवास त्यांनी पालकांसमोर उलगडला.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. मोहन वनरोट्टी यांनी ‘अभियांत्रिकी क्षेत्रातील अमर्याद संधी’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा सायन्स, रोबोटिक्स, ऑटोमेशन, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि इंडस्ट्री 4.0 मुळे अभियांत्रिकी क्षेत्रात अभूतपूर्व बदल घडत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळविण्यावर न थांबता कौशल्याधारित शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकता याकडेही लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी केले. एरोनॉटिकल, मरीन, अॅग्रिकल्चरल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, बायोटेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स यांसारख्या विविध शाखांमध्ये भविष्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आवडी आणि क्षमतांनुसार योग्य शाखेची निवड करण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमात अधिष्ठाता (प्रवेश) डॉ. महेश शिंदे यांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (CAP) २०२६ संदर्भातील सर्व महत्त्वाच्या बाबींचे सविस्तर मार्गदर्शन केले. प्रवेश प्रक्रियेतील विविध टप्पे, आवश्यक कागदपत्रे, बदललेले नियम, अर्ज भरण्याची पद्धत, ऑप्शन फॉर्मचे महत्त्व तसेच विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी सखोल माहिती दिली. “प्रवेश प्रक्रियेतील छोट्याशा त्रुटीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे योग्य माहिती, योग्य वेळी आणि योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत आवश्यक आहे,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना जागरूक राहण्याचे आवाहन केले. तसेच केआयटीच्या माध्यमातून प्रवेश अर्ज भरण्यापासून ते अंतिम प्रवेश निश्चित होईपर्यंत सर्व प्रकारचे मार्गदर्शन आणि सहाय्य पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमानंतर आयोजित प्रश्नोत्तर सत्राला विशेष प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी व पालकांनी प्रवेश प्रक्रिया, शाखा निवड, उच्च शिक्षण, परदेशातील संधी आणि करिअर नियोजन यासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले. डॉ. मोहन वनरोट्टी आणि डॉ. महेश शिंदे यांनी प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर आणि समाधानकारक उत्तर देत उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री साजिद हुदली व सचिव श्री दीपक चौगुले यांचे या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.यावेळी संस्थेचे रजिस्ट्रार डॉ. डी. जे. साठे, विविध विभागांचे अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केआयटी सदैव मार्गदर्शक आणि सहकारी म्हणून त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही डॉ. मोहन वनरोट्टी यांनी दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. अमर टिकोळे यांनी केले.
फोटो :-०१ व ०२ केआयटी च्या वतीने आयोजित ‘अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या संधी व प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया-२०२६’ अ या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना संस्थेचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी व उपस्थित विद्यार्थी पालक वर्ग.
फोटो:-३ व ४ केआयटी अभियांत्रिकी कॉलेजच्या वतीने आयोजित ‘अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या संधी व प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया-२०२६’ च्या कार्यक्रमात उद्घाटनपर सत्रात बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष श्री सचिन मेनन डाव्याकडून डॉ.महेश शिंदे ,श्री सुनील कुलकर्णी,डॉ.मोहन वनरोट्टी.



