कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणीसाठी ३० एकर जागा हस्तांतरित करण्याचा महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय : छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रयत्नांना यश
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय घेतला असून, करवीर तालुक्यातील विकासवाडी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) ताब्यात असलेल्या जमिनीपैकी ३० एकर जमीन कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (KDCA) कडे हस्तांतरित करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम साकारावे, या उद्देशाने छत्रपती संभाजीराजे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. यासाठी विकासवाडी येथील MIDC च्या जमिनीपैकी ३० एकर जमीन KDCA ला उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावर प्रयत्न करण्यात आले.
या संदर्भात, ०३ सप्टेंबर २०२४ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी विकासवाडी येथील MIDC च्या ताब्यातील ३० एकर जमीन KDCA कडे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्या निर्णयास अनुसरून, आज मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला अंतिम मंजुरी देण्यात आली असून, कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा मार्ग आता अधिकृतपणे मोकळा झाला आहे.
हा निर्णय कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार असून, कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अनेक होतकरू क्रिकेटपटूंना याचा मोठा लाभ होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरमधील क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूंनी पाहिलेले स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. मुंबई आणि पुण्यानंतर आता कोल्हापूरही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नकाशावर स्थान मिळवणार आहे.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल छत्रपती संभाजीराजे यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
तसेच, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य मंत्रिमंडळातील सर्व सदस्य, जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार, मंत्रालयातील महसूल, अर्थ, उद्योग व क्रीडा विभागांचे सचिव, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी व क्रीडा विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, केडीसीएचे पदाधिकारी बाळ पाटणकर, ऋतुराज इंगळे, विकासवाडीचे ग्रामस्थ आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचेही त्यांनी विशेष आभार मानले आहेत.



