शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी (ESIC) आणि संलग्न रुग्णालयांची आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत ईएसआयसी योजनेशी संलग्न असलेल्या खाजगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. विशेषतः रुग्णांना उपचार देताना उद्भवणारे प्रशासकीय अडथळे, प्रलंबित देयकांचे प्रश्न आणि तांत्रिक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती घेतली. तसेच त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजना करण्याची सूचना दिली.
कामगार विमा योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून सेवांबाबत चांगल्या प्रतिक्रिया आणि समाधान व्यक्त व्हायला हवे, हेच आपल्या कामकाजाचे यश असेल, असे मत यावेळी उपस्थितांशी बोलताना व्यक्त केले.
याप्रसंगी विमाधारक कामगारांना अधिक व्यापक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नव्याने पात्र ठरलेल्या २५ रुग्णालयांना मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. वैद्यकीय प्रशासन अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात यापूर्वी ६२ रुग्णालये संलग्न होती, आता या नवीन २५ रुग्णालयांच्या समावेशामुळे ही संख्या ८७ झाली आहे. या विस्तारामुळे कामगारांना आता अधिक खाजगी रुग्णालयांमध्ये ‘कॅशलेस’ आणि दर्जेदार उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या बैठकीस कोल्हापूरचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. मिलिंद चौधरी, संचालक डॉ. अशोक थोरात, प्रशासन अधिकारी डॉ. घोंडगे, श्री. बाळासो जाधव यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.