पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा शाश्वत जलसंवर्धन व जलसंधारणाचा ऐतिहासिक वारसा पुढे नेऊया……!

Spread the news

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा शाश्वत जलसंवर्धन व जलसंधारणाचा ऐतिहासिक वारसा पुढे नेऊया……!

­

 

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

  •  

लोकसहभागातून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ अभियान यशस्वी करूया

कागलमध्ये हिरण्यकेशी आणि चिकोत्रा नद्यांमधील पाण्याचे कलशपूजन उत्साहात

कागल दि. २४:
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा शाश्वत जलसंवर्धन व जलसंधारणाचा ऐतिहासिक वारसा समर्थपणे पुढे नेऊया, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. लोकसहभागातून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ अभियान यशस्वी करूया, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्यावतीने आयोजित ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा, जलसंवर्धन, पाणी नियोजन कार्यशाळा आणि जन-जागृती मोहीमे अंतर्गत कागलमध्ये हिरण्यकेशी आणि चिकोत्रा नद्यांच्या पाण्याचे कलशपूजन मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे दि.  १५ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत दि. २५ एप्रिल रोजी मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री नामदार श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांच्या हस्ते ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा प्रारंभ होणार आहे. त्या माध्यमातून जलसंवर्धन, पाणी नियोजन कार्यशाळा आणि जन-जागृती मोहीम राबवून जलसमृद्ध महाराष्ट्राचा संकल्प केला जात आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जन्मभूमी चौंडी, शिर्डी ते कर्मभूमी महेश्वर (मध्यप्रदेश) अशी ही जलयात्रा आहे.

पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी आपल्या कार्यकाळात विहिरी, तलाव, घाट आणि कालव्यांची निर्मिती करून जलसंवर्धन आणि जलसंधारणाचा ऐतिहासिक आदर्श घालून दिला आहे.

श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, या अभियानाच्या माध्यमातून आपण सर्वजण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेला शाश्वत जलसंधारणाच्या ऐतिहासिक कार्याचा वारसा पुढे नेण्याची आणि राज्यात जलसमृद्धी आणण्यासाठी कटिबद्ध असल्याची शपथ घेऊया……!

वारसा जलसंवर्धनाचा……!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, या उपक्रमांचा मुख्य उद्देश शेतीसाठी सिंचन व्यवस्था सक्षम करणे, पाण्याचा थेंब अन् थेंब जपून वापर करणे आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून लोकसहभागातून जलसंधारण चळवळ राबवणे हा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जलव्यवस्थापनाचा वारसा पुढे नेणे, शाश्वत पाणी नियोजन आणि जलसंवर्धन जनजागृती करण्यासह हा पंधरवडा अहिल्यादेवींच्या आदर्श जल व्यवस्थापनाची आठवण करून देणारा आणि पाणी वाचवण्याचा संदेश देणारा उपक्रम आहे.

स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे यांनी केले.

यावेळी उपविभागीय अभियंता गणेश मगदूम, उपविभागीय अभियंता अविनाश फडतारे, उपविभागीय अभियंता सचिन जाधव, कनिष्ठ अभियंता एम. के. चव्हाण, सागर गोळे, अमर मोरे, सागर पाटील, अजिंक्य पाटील, प्रणिता कांबळे, सायली केणे, शुभम संकपाळ, सतीश पाटील, किरण जाधव आदी प्रमुख उपस्थित होते.
………..

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या “गोदा ते नर्मदा” या जलयात्रेमध्ये समाविष्ट करण्यासाठी हिरण्यकेशी व चिकोत्रा नदीतून आणलेल्या कलशांचे पूजन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, अधिकारी व शेतकरी.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!