कोल्हापूरच्या वाचन चळवळीच्या वैभवात ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’च्या ग्रंथदालनाची भर – श्रीमंत शाहू छत्रपती महाराज

Spread the news

कोल्हापूरच्या वाचन चळवळीच्या वैभवात ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’च्या ग्रंथदालनाची भर – श्रीमंत शाहू छत्रपती महाराज

­

 

कोल्हापूर: प्रतिनिधी

  •  

मराठी प्रकाशन विश्वातील अग्रगण्य नाव असलेल्या ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’च्या सुसज्ज ग्रंथदालनाचा भव्य उद्घाटन सोहळा करवीर नगरीत दिमाखात संपन्न झाला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते फित कापून व दीपप्रज्वलन करून या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. “मेहता पब्लिशिंगचे हे ग्रंथदालन कोल्हापूरच्या वाचन चळवळीच्या वैभवात मोलाची भर घालेल,” असा सार्थ विश्वास यावेळी श्रीमंत शाहू महाराज यांनी व्यक्त केला.

राजारामपुरी येथील लेन नंबर ५ मधील ‘जयश्री हाईट्स’ येथे हे दालन साकारले आहे. उद्घाटन प्रसंगी मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक अखिल मेहता, साहिल मेहता, रूपा मेहता आणि नुपूर मेहता यांची प्रमुख उपस्थिती होती.

वाचन संस्कृतीचा गौरव आणि ग्रंथालयांचा सत्कार

केवळ पुस्तक विक्री हा उद्देश न ठेवता वाचन संस्कृती जपणाऱ्या घटकांचा सन्मान या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले. यावेळी जिल्ह्यातील वाचन चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या निवडक ग्रंथालयांचा आणि वाचकांचा पुस्तक भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये:
ग्रंथालये:
आपटे वाचन मंदिर (इचलकरंजी), रसिक रंजन ग्रंथालय (घुणकी), पूज्य साने गुरुजी वाचनालय (गडहिंग्लज), तरुण भारत वाचनालय (आरदाळ) आणि
जिल्हा परिषद विद्यामंदिर (सडोली दुमाला)
वाचक: श्री. एस. आर. कामत, प्रकाश आमते, राजेंद्र घोडके, उत्तम तळवार,आणि प्रा. श्रीकांत नाईक.

पुण्यानंतर कोल्हापुरात ‘चेन स्टोअर’ संकल्पना

मेहता पब्लिशिंग हाऊसने मराठी प्रकाशनात प्रथमच राबवलेली ‘चेन स्टोअर’ची अभिनव संकल्पना पुण्यानंतर आता कोल्हापुरात विस्तारली आहे. या दालनामध्ये वाचकांना एकाच छताखाली ३००० हून अधिक स्वतंत्र शीर्षके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये अभिजात मराठी साहित्यासोबतच जागतिक स्तरावरील दर्जेदार अनुवादित पुस्तकांचा खजिना रसिकांसाठी खुला झाला आहे.

सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य

१९७६ मध्ये स्थापन झालेल्या मेहता पब्लिशिंग हाऊसचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. गेल्या पाच दशकांपासून देश-विदेशातील शेकडो लेखक आणि अनुवादकांना वाचकांशी जोडण्याचे काम ही संस्था करत आहे. या ५० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा भाग म्हणून कोल्हापुरातील वाचकांसाठी आणि ग्रंथालयांसाठी विशेष सवलतींची योजनाही जाहीर करण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे संचालक अखिल मेहता यांनी प्रास्ताविक केले व श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचे स्वागत केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रतीक येतावडेकर यांनी केले. या सोहळ्याला कोल्हापूर शहर व परिसरातील साहित्यिक, मान्यवर रसिक आणि पुस्तकप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!