केडीसीसी बँक लाडक्या बहिणींना करणार रू. ५० हजार कर्जपुरवठा
संचालक मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय
ताराराणी महिला सक्षमीकरण योजनेची कर्ज मर्यादा रू. ३० वरून रू. ५० हजार
आत्तापर्यंत १७ हजार महिलांना रू. ५१ कोटी अर्थसहाय्याचे वाटप
कोल्हापूर, दि. ३:
कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने यापुढे लाडक्या बहिणींसाठी रू. ५० हजार कर्ज पुरवठा केला जाणार आहे. बँक राबवित असलेल्या “ताराराणी महिला सक्षमीकरण योजने” अंतर्गत बँकेने ही कर्जमर्यादा रू. ३० हजारवरून वाढवून रू. ५० हजार केली आहे. या योजनेअंतर्गत बँकेने आत्तापर्यंत १७ हजार महिलांना रू. ५१ कोटी अर्थसहाय्याचे वाटप केले आहे.
बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, माता-भगिनींच्या स्वावलंबनासाठी बँकेने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने” तील पात्र लाभार्थी महिलांना बँक या आधी व्यवसायाकरीता रू. ३० हजार पर्यंतचे वैयक्तिक कर्ज ३६ महिने मुदतीने दहा टक्के व्याजदराने देत होती. या कर्जाचा मासिक हप्ता दरमहा ९६८ रुपये इतका होता. यापूर्वी रु. तीस हजार रुपये कर्ज घेतलेल्या महिलांनाही त्यांच्या मागणीनुसार जादाचे रु. २०,००० कर्ज दिले जाणार आहे. या अर्थसाह्यामध्ये वाढ करून ते रू. ३०,००० ऐवजी रू. ५०, ००० कर्ज, ४८ महिने मुदतीने दहा टक्के व्याजदराने देण्यात येणार आहे. त्याचा मासिक हप्ता रू. १,२६८ रुपये असेल. याआधी तीन वर्षे असलेली मुदत यापुढे चार वर्षे केली आहे. मुद्दल अधिक व्याज असा दरमहा रू. १,२६८ रुपयांचा मासिक हप्ता आहे.
माता- भगिनींच्या रोजगारासाठी…..!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, केडीसीसी बँकेने माता-भगिनींच्या सक्षमीकरणासाठी हे धोरण निश्चित केलेले आहे. गरजू, कष्टकरी व आर्थिक दुर्बल महिलांची दैनंदिन व्यवहार, व्यवसायामध्ये सावकारी व मायक्रो फायनान्स इत्यादीकडून ज्यादा व्याज आकारणीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत असते. ही आर्थिक पिळवणूक थांबविण्याच्या उद्देशाने व महिलांचा आर्थिकस्तर उंचावून त्यांना आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने बँकेने उचललेले हे एक आश्वासक पाऊल आहे. महिलांना आत्मनिर्भर करण्याकरीता उद्योग व व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध असलेल्या स्वयंरोजगाराच्या संधी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने” मधील पात्र लाभार्थी असलेल्या महिलांना याआधी बँक रु. ३० हजार कर्ज पुरवठा करीतच होती. माता-भगिनी व महिला बचत गटांच्या मागणीनुसार तो वाढवून आता रू. ५० हजार करण्याचे धोरण घेतले आहे.
या बैठकीला उपाध्यक्ष माजी आमदार राजूबाबा आवळे, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार डाॅ. राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार अमल महाडिक, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैया माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, विजयसिंह माने, राजेश पाटील, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप लोखंडे व गजानन पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.




