*काँग्रेसच्या जिल्हाधक्षपदी पुन्हा सतेज पाटील, शहराध्यक्षपदी प्रवीण केसरकर*
*कोल्हापूर :* काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते, आमदार सतेज पाटील यांची फेरनिवड करण्यात आली असून नगरसेवक प्रवीण केसरकर यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस सी. वेणूगोपाल यांनी या निवडी बुधवारी जाहीर केल्या. सप्टेंबर 2019 मध्ये आमदार सतेज पाटील यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठे यश मिळवले. शिवाय, कोल्हापूर महापालिका, व जिल्हा परिषद निवडणुकीतही काँग्रेसने ताकद दाखवल्याने सतेज पाटील यांचे नेतृत्व अधिक बळकट झाले. त्यामुळे पक्षाने त्यांना पुन्हा या पदावर संधी दिली आहे. दरम्यान, काँग्रेसने शहराध्यक्षपदाचा चेहरा बदलला असून विद्यमान शराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या जागी नगरसेवक प्रवीण केसरकर यांना या पदावर संधी दिली आहे. महापालिका निवडणुकीत पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असून पक्षाची ताकद टिकवून ठेवण्यासाठी जेष्ठ नगरसेवक केसरकर यांची शहराध्यक्षपदावर वर्णी लागली आहे. काँग्रेसने संघटनात्मक बदल करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी निरीक्षक नेमले होते. कोल्हापूर ग्रामीणसाठी काँग्रेसचे मुख्य निरीक्षक जयशंकर पाठक तर शहरासाठी पक्ष निरीक्षक खासदार प्रतिभा धानोरकर यांची नियुक्ती केली होती. त्यांनी कोल्हापूर शहरातील कार्यकर्त्यांशी मते जाणून घेतली होती. त्याचा अहवाल प्रदेश काँग्रेसला पाठवला होता. त्यानुसार या निवडी करण्यात आल्या. यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संकपाळ यांचे मार्गदर्शन लाभले





