विवेकानंद कॉलेजच्या बी.बी.ए. आणि एम.बी.ए. विद्यार्थ्यांचे कॅम्पस प्लेसमेंटमध्ये घवघवीत यश
संकेत खद्रे याला तब्बल १८ लाखांचे सर्वोच्च पॅकेज, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
कोल्हापूर दि. 26 : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कॉलेजने आपल्या शैक्षणिक आणि प्रशिक्षण दर्जामधील उत्कृष्टतेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. कॉलेजच्या बीबीए (BBA) आणि एमबीए (MBA) मधील विद्यार्थ्यांची विविध नामांकित नॅशनल आणि मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये उत्तम पॅकेजसह निवड झाली असून, सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
बिझनेस ॲनालिटिक्स विभागात शिक्षण घेत असलेल्या संकेत खद्रे याने सर्वाधिक १८ लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळवले आहे. ह्युमन रिसोर्स मधील श्रेया भोसलेला १० लाखांचे, तर याच विभागातील प्रणाली भामनगोल हिला ५.६ लाखांचे पॅकेज मिळाले आहे. फायनान्स विभागातील कुणाल भोसले याला ४ लाख आणि मार्केटिंगमधील शालिनी जांगीड हिला देखील ४ लाखांच्या पॅकेजची ऑफर मिळाली आहे. याशिवाय इतर अनेक विद्यार्थ्यांची विविध क्षेत्रातील नॅशनल आणि मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी कॉलेजच्या आवारात एका विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मा. श्री. कौस्तुभ गावडे, कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील आणि आयक्यूएसी (IQAC) प्रमुख डॉ. श्रुती जोशी, बीबीए आणि एमबीए विभागाचे प्रमुख डॉ. विराज जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते निवड झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
प्रसंगी मार्गदर्शन करताना सीईओ मा. श्री. कौस्तुभ गावडे यांनी विवेकानंद कॉलेजमधील बीबीए आणि एमबीए अभ्यासक्रमांमध्ये कौशल्य विकासावर विशेष भर दिला जातो. विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट क्षेत्रासाठी सज्ज करणे आणि त्यांच्यामधून भविष्यातील उत्तम नेतृत्व घडवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यावर खूप मेहनत घेतात आणि आजचे प्लेसमेंटचे यश हे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या एकत्रित कष्टाचे फळ आहे, असे प्रतिपादन केले.
कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील यांनी आपल्या मनोगतात, विद्यार्थ्यांनी आपली व्यावसायिक जबाबदारी नेहमी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडावी. कठोर परिश्रमाला नेहमीच फळ मिळते. नोकरीच्या ठिकाणी इमानदार राहा आणि आपल्या संस्थेचे नाव मोठे करा, असे प्रतिपादन केले.
आयक्यूएसी (IQAC) प्रमुख डॉ. श्रुती जोशी यांनी आपल्या मनोगतात, आजच्या या वेगाने बदलणाऱ्या आणि स्पर्धेच्या युगात टिकून राहायचे असेल तर नवीन कौशल्ये आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे. स्वतःमधील कौशल्ये वाढवण्याची आणि शिकण्याची प्रक्रिया कधीही थांबवू नका, असे मत मांडले.
या संपूर्ण वाटचालीत विद्यार्थ्यांना संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब यांचे सतत मार्गदर्शन लाभले असून, त्यांच्या दूरदृष्टीचा आणि पाठिंब्याचा त्यांच्या करिअरला आकार देण्यात मोठा वाटा आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार बीबीए आणि एमबीए विभागाचे प्रमुख डॉ. विराज जाधव यांनी केले. ही प्लेसमेंट ड्राइव्ह यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणारे सर्व मान्यवर, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.





