माणिक पाटलांच्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; मुंबईत लवकरच बैठक होणार!
…पण ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या ‘पाठ फिरवण्यामुळे’ कोल्हापुरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी
कोल्हापूर, ता. २७:
उसाला प्रतिटन ४,५०० रुपये एफ.आर.पी. मिळावा आणि साखरेच्या एम.एस.पी.मध्ये प्रतिक्विंटल २० रुपयांची वाढ व्हावी, या मागण्यांसाठी चुये (ता. करवीर) येथे सुरू असलेल्या माणिक पाटील चुयेकर यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाची थेट राज्य शासनाने दखल घेतली आहे. या महत्त्वपूर्ण मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत लवकरच संबंधितांची विशेष बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे चेअरमन आमदार अमल महाडिक यांनी आज येथे देऊन
आंदोलनाला भारतीय जनता पक्ष आणि छत्रपती राजाराम साखर कारखान्याचा पूर्ण पाठिंबा जाहीर केला.
यावेळी बोलताना महाडिक म्हणाले की, “माणिक पाटील यांनी उपस्थित केलेले मुद्दे अत्यंत न्याय्य आणि शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. या मागण्यांबाबत मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत, मुंबईत तातडीने बैठक लावून प्रश्न सोडवण्याचे आश्वासित केले आहे.”
परंतु, एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, शेतकरी संघटना आणि हजारो शेतकऱ्यांनी आंदोलन स्थळाला भेट देऊन आपला सक्रिय पाठिंबा दर्शवला असताना, जिल्ह्याचे ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र या आंदोलन स्थळाकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. यामुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी मंत्री मुश्रीफ यांच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सातव्या दिवशी प्रकृती खालावली; तातडीने तोडगा काढण्याची मागणी
आज या अन्नत्याग आंदोलनाचा सातवा दिवस आहे. सात दिवसांच्या उपोषणामुळे माणिक पाटील यांचे वजन आणि रक्तातील साखरेचे प्रमाण (शुगर लेव्हल) झपाट्याने घटले आहे. त्यांच्या या खालावत्या प्रकृतीबद्दल आमदार महाडिक यांनी तीव्र चिंता व्यक्त केली व मुख्यमंत्र्यांनी बैठकीचे आश्वासन दिले असल्याने पाटील यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली.
माणिक पाटील यांची प्रकृती चिंताजनक बनत चालली असल्याने, आता केवळ आश्वासने न देता, कोल्हापूरच्या जबाबदार मंत्र्यांनी शासन दरबारी तातडीने वजन वापरून या प्रकरणी तात्काळ बैठक लावून निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनस्थळी उपस्थित शेतकऱ्यांनी केली आहे.
संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांचा राबता
दरम्यान, या आंदोलनाला जिल्ह्याभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. आज दिवसभरात ‘स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड’चे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, संघटक नागनाथ बेनके, प्रताप पाटील कावनेकर, चेतन चव्हाण यांच्यासह परिसरातील शेतकरी आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळाला भेट देऊन आपला सक्रिय पाठिंबा दर्शवला.




