दोन हजारांहून अधिक नागरिकांची घरपोच मोफत हृदय तपासणी मोहीम

Spread the news

दोन हजारांहून अधिक नागरिकांची घरपोच मोफत हृदय तपासणी मोहीम

एसआयआर बाबत कार्यकर्त्यांनी दक्ष रहावे

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

कागल :
हृदयरोग हा आजच्या काळातील गंभीर आणि वाढता आजार असून त्याचे वेळेवर निदान होणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेवर निदान आणि योग्य उपचार झाल्यास काहीही होत नाही. यासाठी कागल मतदारसंघात घराघरात जाऊन दोन हजारांहून अधिक नागरिकांची मोफत हृदय तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. अत्याधुनिक पोर्टेबल मशीनवर इको टु डी तंत्रज्ञानाच्या मदतीने अवघ्या आठ मिनिटांत तपासणीचा अहवाल उपलब्ध होणार असून, वेळेत उपचार केल्यास हृदयरोगावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कागल येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

  •  

यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. नाव पात्र यादीत असले तरी संबंधितांनी सही करून आवश्यक फॉर्म भरावेत. एकदा वेळ निघून गेली तर ती पुन्हा परत येत नाही. ही मोहीम गावनिहाय, गल्लीनिहाय व घरोघरी गांभीर्याने राबवावी.

श्री. मुश्रीफ म्हणाले, भैय्या माने यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. पदवीधर मतदार नोंदणी पुन्हा सुरू झाली असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घ्यावा. प्रताप उर्फ भैय्या माने यांच्या रूपाने कागल तालुक्याला दुसरा आमदार मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काही महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांची डोळे तपासणी करण्यात आली होती. त्या विद्यार्थ्यांसाठीचे चष्मे आता प्राप्त झाले असून, लवकरच त्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

ना ना करते प्यार…..!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, भारताच्या सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपुर यांचे नुकतेच निधन झाले. विद्यार्थी अवस्था आणि महाविद्यालयीन काळापासूनच त्या माझ्या आवडत्या गायिका होत्या. तात्कालीक परिस्थितीमुळे त्यांना योग्य आणि पुरेशी संधी मिळाली नाही, त्यांच्यावर अन्यायच झाला. त्यांनी गायलेली “आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर” आणि “ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे” ही माझ्या आवडीची गाणी मी आजही गुणगुणत असतो. या गाण्यांच्या संदर्भाने दुसरं काही मनात आणू नका, असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास तहसीलदार अमरदीप वाकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, गडहिंग्लजचे नगराध्यक्ष तुरबतमठ, वसंतराव धुरे, शशिकांत खोत, रंगराव पाटील, मनोज फराकटे, प्रवीण भोसले, प्रकाश गाडेकर, चंद्रकांत गवळी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत विकास पाटील-कुरुकलीकर यांनी केले. सूत्रसंचालन विशाल बेलवळेकर यांनी तर आभार संजय चितारी यांनी मानले.
………….

कागल- कागलमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!