डॉ. सुनीलकुमार लवटे यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान जाहीर गदिमा प्रतिष्ठानचा विशेष सन्मान

Spread the news

पुणे.
डॉ. सुनीलकुमार लवटे यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान जाहीर
गदिमा प्रतिष्ठानचा विशेष सन्मान

­

 

पुणे : प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान या वर्षी ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत सुनीलकुमार लवटे यांना जाहीर झाला आहे. दर्जेदार कार्यक्रमांच्या माध्यमातून गेली ४८ वर्षे श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यासाठी कार्यरत असलेल्या गदिमा प्रतिष्ठानचा यावर्षी विशेष सन्मान करण्यात येणार आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. अशी माहिती प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जयंती दिनी १५ जुलै रोजी (बुधवार) सायं. ६.०० वा. एस. एम. जोशी सभागृहात होणाऱ्या समारंभात महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्काराचे हे तेरावे वर्ष असून यापूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. रघुनाथ माशेलकर, सिंधुताई सपकाळ, प्रा. द. मा. मिरासदार, डॉ. ह. वि. सरदेसाई, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, नरेंद्र चपळगावकर, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. यशवंत पाटणे, डॉ. अरुणा ढेरे, चारुदत्त आफळे, डॉ. शंकर अभ्यंकर यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
प्रा. जोशी म्हणाले, “महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत आणि ख्यातनाम वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीची स्थापना करण्यात आली. आपल्या अमोघ आणि विचारसंपन्न वक्तृत्वाच्या माध्यमातून समाजमानस समृद्ध करण्याचे काम प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी केले. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत व्रतस्थ वृत्तीने काम करणाऱ्या माणसांविषयी प्राचार्यांना विलक्षण आदर होता. डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी गेली पाच दशके लेखनातून आणि व्याख्यानातून विचारजागर केला. या योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचे समितीने ठरविले आहे. तसेच श्रवण संस्कृती समृद्ध करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल गदिमा प्रतिष्ठानचा सन्मान करताना समाधान वाटत आहे.

  •  

प्रा. मिलिंद जोशी
(अध्यक्ष)


Spread the news

You may also like

error: Content is protected !!