अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासोबत कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा राबवावा : आ. राजेश क्षीरसागर
मुंबई / कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) तीर्थक्षेत्र विकास व कॉरिडॉर प्रकल्पाची अंमलबजावणी करताना केवळ मंदिर परिसरापुरता विकास मर्यादित न ठेवता संपूर्ण कोल्हापूर शहराच्या वाहतूक, पार्किंग, नागरी सुविधा आणि दीर्घकालीन शाश्वत विकासाचा समन्वित आराखडा शासनाने तातडीने तयार करावा, अशी जोरदार मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.
यावेळी त्यांनी सांगितले की, करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून साडेतीन शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे शक्तिपीठ आहे. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाने सुमारे ₹१,४९७ कोटींच्या अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास व कॉरिडॉर प्रकल्पास मंजुरी दिली आहे. दरवर्षी देशभरातून ५० लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी कोल्हापुरात येत असल्याने शहरातील वाहतूक कोंडी, पार्किंगची कमतरता, अरुंद रस्ते आणि अपुऱ्या नागरी सुविधांचा प्रश्न अधिक गंभीर होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
आ. क्षीरसागर यांनी सांगितले की, अंबाबाई मंदिर परिसराचा विकास करताना स्थानिक व्यापारी, रहिवासी, व्यावसायिक आणि मालमत्ताधारक यांच्यावर अन्याय होणार नाही, त्यांच्या पुनर्वसनाची योग्य व्यवस्था होईल आणि त्यांच्या हितसंबंधांचे संरक्षण केले जाईल, अशी शासनाची भूमिका असली तरी विकास प्रक्रियेत नागरिकांचा विश्वास संपादन करणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यांनी पुढे नमूद केले की, कोल्हापूर शहराची हद्दवाढ अनेक वर्षांपासून प्रलंबित असून १९९८ च्या विकास आराखड्यातील अनेक महत्त्वाचे रस्ते अद्याप पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे शहराच्या नियोजनावर परिणाम होत असून भविष्यातील विकासात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पासोबतच वाहतूक व्यवस्थापन, बहुमजली पार्किंग, रिंग रोड, स्कायवॉक, पादचारी सुविधा आणि ई-वाहतूक व्यवस्थेचा समावेश असलेला व्यापक विकास आराखडा तयार करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कॉरिडॉर प्रकल्पाच्या अनुषंगाने अंबाबाई मंदिर ते शिवाजी स्टेडियमदरम्यान भूमिगत मार्ग उभारण्याच्या पर्यायाचाही विचार व्हावा, अशी सूचना त्यांनी केली. तसेच प्रस्तावित ३० मीटर संपादन क्षेत्राचा पुनर्विचार करून कमीत कमी संपादनातून स्थानिकांची घरे व दुकाने बाधित होणार नाहीत, याची काळजी घेण्याची मागणी त्यांनी केली. बाह्य मार्गाने वाहतुकीचे नियोजन केल्यास मोठ्या प्रमाणात निधीची बचत होऊन तो इतर विकासकामांसाठी वापरता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
शाहू मिल परिसरातील सुमारे २१ एकर जागेवर अत्याधुनिक पार्किंग हब उभारून तेथून ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) शटल सेवेद्वारे भाविकांना मंदिर परिसरात पोहोचविण्याची व्यवस्था केल्यास शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, असा पर्यायही त्यांनी सभागृहासमोर मांडला.
कोणताही विकास आराखडा राबविताना स्थानिक नागरिक, व्यापारी, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावेत, अशी मागणी करत त्यांनी शासनाने सद्यस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पासोबत कोल्हापूर शहराच्या वाहतूक, पार्किंग, नागरी सुविधा आणि दीर्घकालीन शाश्वत विकासाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती पर्यटन, सांस्कृतिक कार्य व पुरातत्त्व विभागाच्या मंत्र्यांकडे औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.




