कॉ. सुशीला यादव स्मृतीप्रीत्यर्थ पुस्तक प्रकाशन; तीन सामाजिक संस्थांना ₹७५ हजारांची मदत

Spread the news

कॉ. सुशीला यादव स्मृतीप्रीत्यर्थ पुस्तक प्रकाशन; तीन सामाजिक संस्थांना ₹७५ हजारांची मदत

­

 

कोल्हापूर : मोलकरीण, शेतमजूर आणि परिचारिका चळवळीच्या लढाऊ नेत्या दिवंगत कॉ. सुशीला यादव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘कष्टकरी स्त्रियांचा एल्गार : कॉम्रेड सुशीला यादव’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी शिवाजी पेठ येथील सुमन लॉज सभागृहात झाले. यावेळी त्यांच्या कार्याला अभिवादन करत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत तीन संस्थांना प्रत्येकी २५ हजार याप्रमाणे ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

  •  

रावबहादूर विचारे विद्यालय, शिवाजी मराठा हायस्कूल आणि चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ या संस्थांना ७५ हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास संजय गुरव, सुधाकर सावंत, विनोदकुमार भोंग, पी. डी. काटकर, कॉ. दिलीप पवार, विजय चोरमारे, विजय शिंदे, डॉ. अरुण शिंदे, अनिल म्हमाने, अभय बकरे, जगदीश पाटील, चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीचे संस्थापक मिलिंद यादव, कॉ. बाबासाहेब यादव आदी उपस्थित होते.

कॉ. सुशीला यादव यांनी आयुष्यभर असंघटित क्षेत्रातील महिलांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. २००४ मध्ये राज्यातील पहिली घरेलू कामगार (मोलकरीण) संघटना उभारण्यात त्यांनी पुढाकार घेतला. किमान वेतन, साप्ताहिक सुट्टी, सामाजिक सुरक्षा, पेन्शन, कल्याण मंडळ आणि कायदेशीर संरक्षणासाठी त्यांनी अनेक आंदोलने उभारली. शेतमजूर आणि परिचारिका संघटनांमधूनही हजारो महिलांना संघटित करून त्यांच्यात हक्कांची जाणीव निर्माण केली.

१८ जून १९५५ रोजी जन्मलेल्या कॉ. सुशीला यादव यांचे दहा दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे देहदान करण्यात आले. त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

फोटो
कष्टकरी स्त्रियांचा एल्गार कॉम्रेड सुशीला यादव या पुस्तक प्रकाशन प्रसंगी डावीकडून संजय गुरव, सुधाकर सावंत, विनोदकुमार भोंग, पी. डी. काटकर कॉ. दिलीप पवार, कॉ. बाबासाहेब यादव, विजय चोरमारे, डॉ. अरुण शिंदे, अनिल म्हमाने, अभय बकरे, मिलिंद यादव, जगदीश पाटील आणि मान्यवर


Spread the news

You may also like

error: Content is protected !!